nanasaheb-patils-patri-sarkar-was-strict-against-british-agents & money lenders | Sarkarnama

क्रांतीसिंह नाना पाटील यांचे सरकार खरोखर पत्र्या मारीत होते काय ?

संपत मोरे
रविवार, 12 ऑगस्ट 2018

पत्री सरकारने  निरा काठ ते  वारणा काठ या नद्यांच्या खोऱ्यात  सुमारे ६५० गावात आपलं सरकार स्थापन केलं. या गावातील लोकांनी इंग्रजी राजवट नाकारत  स्वराज्य घोषित केलं. पत्री सरकारने या गावातून ग्रामराज्य आणि न्यायदान मंडळे स्थापन केली.

पुणे :  सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट यादरम्यान  १९४२ साली पत्री सरकार स्थापन झाले . इंग्रजांची राजवट जुमानायची नाही,आपणच आपलं सरकार बनवायचं ही या सरकारची मूळ कल्पना होती. या सरकारमध्ये क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, क्रांतिअग्रणी जी डी लाड,किसन वीर,पांडुरंग पाटील उर्फ पांडू मास्तर यांच्यासारखे लढाऊ तरुण सहभागी झाले. 

पत्रीसरकारने  निरा काठ ते  वारणा काठ या नद्यांच्या खोऱ्यात  सुमारे ६५० गावात आपलं सरकार स्थापन केलं. या गावातील लोकांनी इंग्रजी राजवट नाकारत  स्वराज्य घोषित केलं. पत्रीसरकारने या गावातून ग्रामराज्य आणि न्यायदान मंडळे स्थापन केली. ब्रिटिशांच्या विरोधात छोडो भारत ची हाक दिल्यावर देशातील प्रमुख नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले ,याला प्रत्त्युत्तर देण्यासाठी देशभर जे उठाव झाले . तसाच एक उठाव  साताऱ्यात झाला . तोच पत्रीसरकारचा उठाव. या  पत्रीसरकारच्या क्रांतिवीरांनी सातारा भागात सरकारी कार्यालये,डाक बंगले,पोस्ट ऑफिसेस  जाळली .पगाराच्या गाड्या लुटल्या ते पैसे चळवळीसाठी वापरले. 

क्रांतिसिंह नाना पाटील यांचा विषय निघाल्यावर पत्री सरकार हा विषय येतोच . एकदा माझ्या मित्रानं  मला विचारलं ,"बैलाच्या पायाला पत्री मारतात तशी पत्री पत्री सरकारचे लोक माणसांना मारत होते काय ?"

त्याला पत्री मारणं म्हणजे लोकांच्या पायात खिळे ठोकून  लोखंडी पत्र्या मारणं असच वाटत होत. 

तो म्हणाला "मी लहान असताना पाहिलंय बैलाला पत्री मारताना.तशी पत्री माणसाला मारली तर किती हाल होत असतील ?. "

पत्री मारणं म्हणजे लोखंडी पत्र्या पायात मारणं असं कोणालाही वाटत पण पत्री सरकारची पत्री तसली नव्हती. ती पत्री नेमकी कसली होती ?आणि अशी पत्री कोणाला लावली गेली?

 इंग्रजांच्या खबऱ्यांना पत्र्या 

सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे गावचा एक पुढारी इंग्रजांचा खबऱ्या होत्या.त्याच्या अनेक तक्रारी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कानावर गेलेल्या.एका सांयकाळी दोन पोलीस त्या पुढाऱ्याच्या दारात गेले. त्याला म्हणाले गावाच्या बाहेर साहेब येऊन  थांबले आहेत त्यांनी तुम्हाला भेटायला बोलावलं आहे. ते ऐकून तो पुढारी पोलिसांच्या सोबत गावाच्या बाहेर गेला. गावाच्या बाहेरच्या माळावर आल्यावर अजून काही पोलीस थांबले होते. त्यात एक साहेब होते. साहेबानी पुढाऱ्याला विचारलं. 

  "नाना पाटलाची काय खबरबात ?"

 "सध्या काय नाही साहेब,पण समजल्यावर मी कळवतोच की  "

तो पुढारी असं म्हणताच पाठीमागं उभा असलेल्या पोलिसानं त्याला लाथ घातली. 

'साहेब मला का मारताय ?"

"त्वा आम्हाला ओळखलेलं नाहीस. आमी पोलीस न्हाय. नाना पाटलाची माणसं हाय. तू ज्या नाना पाटलाच्या बातम्या देतोस. तो नाना पाटील तुझ्या पुढं उभा हाय बघ."

त्यानं समोर पाहिलं तर एक धिप्पाड बलदंड  देहयष्टीचा  माणूस उभा होता. त्याच्याही अंगावर पोलिसांचे कपडे होते. मग त्या लोकांनी त्या पुढाऱ्याचे दोन्ही पाय बांधले. त्याच्या तळ पायावर चुन्याचं पाणी टाकून काठीचे तडाखे दिले.असं करणं म्हणजे पत्री लावणं. 

सावकाराला धडा

कुंडलजवळच्या एका  गावातील  खाजगी सावकार लोकांना त्रास देत होता.गोरगरिबांच्या जमिनी बळकावत होता,त्याच्याकडे जमिनी गहाण पडलेले लोक हतबल झाले होते. तो पोलिसांच्याही जवळचा होता. पोलीस त्याच्याकडे मेजवानी झोडायला यायचे त्यामुळे त्याची सामान्य लोकांच्यावर दहशत तयार झालेली. याच सावकाराचा बंदोबस्त करायचे प्रति सरकारने ठरवले. 

एका रात्री सगळे सैनिक जमा झाले आणि त्या गावाच्या दिशेनं निघाले. रात्री त्याच्या वाड्याचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला.सावकाराने या हालचाली बघून लगेच एक युक्ती केली. तो अंगावर साडी घेऊन घरातील बायका जिथं झोपल्या होत्या तिथं जाऊन झोपला. सगळीकडं शोध घेऊन तो सावकार सापडत नाही म्हटल्यावर मग हे पत्रीसरकारचे लोक जिथं बायका झोपल्या होत्या त्या खोलीत गेले. गणपती यादव नावाच्या चलाख सैनिकाने झोपण्याच्या पद्धतीवरून त्या सावकाराला ओळखले त्याच्या तोंडावरन पांघरून घेतलेली साडी बाजूला केले,

ते म्हणाले,"ह्यो इथं लपलाय बघा."मग त्याला उचलून गावाच्या बाहेर घेऊन निघाले.जाताना त्याला सगळी कर्जखाते घ्यायला सांगितली. गावाच्या बाहेर जाऊन सगळी कर्जखाते जाळली. त्याच्या पायाला पत्री मारली.आणि परत येऊन सगळ्या गावाला कर्जमुक्त झाल्याची दवंडी पिटली.या घटनेचा परिणाम असा झाला लोकांना पत्रीसरकारचा आधार वाटायला लागला.या शिक्षेमुळं ज्याला पत्री लावली आहे त्याला काही महिने चालत येत नव्हते,या आगळ्या आणि वेगळ्या शिक्षेचा गावगुंड आणि दरोडेखोर यांनी चांगलाच धसका घेतला.

जनतेचे पाठबळ 
खरं तर पत्री सरकारने केवळ पत्र्या लावण्याचंच काम केलं का असा प्रश्न पडेल पण पत्रीसरकार हे प्रतिसरकार होते.त्यानी एका विचाराची निर्मिती केली होती.ज्या काळात सामान्य माणसाला पोलिसांचा आधार वाटत नव्हता त्या काळात याच लोकांना पत्री सरकारचा आधार वाटत होता,लोक न्याय मागायला त्यांच्याकडं जात होती आणि त्याना न्याय मिळत होते. प्रतिसरकार ही मूळची कल्पना पण पत्री लावण्याची शिक्षा खूपच गाजल्यामुळे त्या सरकारला लोक पत्री सरकार म्हणत होते हेच नाव सर्वत्र रूढ झाले

पत्री सरकारमधील लोकांना पकडण्यासाठी ब्रिटिशांनी हजारो रुपयांची बक्षीस लावली होती पण गरीब जनतेने कधीही पैशाच्या लोभाने गद्दारी केली नाही उलट अनेकदा नाना पाटील किंवा अन्य लोकांच्या मागे पोलीस लागले असताना ते ज्या दिशेने गेले त्याच्या उलटी दिशा सांगून लोकांनी पोलिसांची दिशाभूल करत क्रांतीकारकांना वाचवल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. ज्या लोकांची दोन वेळेची चूल पेटत नव्हती त्या गरीब लोकांनी केलेली ही कामगीरी होती हे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे.

पत्री सरकारला एकाच वेळी ब्रिटिश सरकार, गावगुंड आणि सरकारचे अभय असलेले दरोडेखोर यांच्या विरोधात लढावे लागत होते. आणि ही लढाई पत्री सरकाने जिंकली.सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत लोकांच्या बळावर ही अभिनव लढाई यशस्वी झाली. पत्रीसरकार ही जशी एक चळवळ होती तसा एक विचार होता. सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणांनी एकत्र येत एका शक्तिशाली सत्तेला आव्हान दिलं होतं. ही खूपच मोठी गोष्ट होती.

संबंधित लेख