nana patole said chalo dhelhi | Sarkarnama

नाना पटोलेंचे आता "चलो, दिल्ली' 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

नागपूर :  शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर केंद्र सरकारला घेरण्यासाठी शेतकरी व शेतमजूर कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली येत्या 23 ऑक्‍टोबरला दिल्लीत संसदेला घेरावो घालण्यात येणार आहे. 

नागपूर :  शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर केंद्र सरकारला घेरण्यासाठी शेतकरी व शेतमजूर कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली येत्या 23 ऑक्‍टोबरला दिल्लीत संसदेला घेरावो घालण्यात येणार आहे. 

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावरूनच पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. यानंतर गेल्या डिसेंबर महिन्यात त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला तसेच भाजपला रामराम ठोकून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांची शेती व शेतमजूर कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती केली. 

राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती झाल्यानंतर नाना पटोले यांनी थेट दिल्लीत शक्ती दाखविण्याचे ठरविले आहे. येत्या 23 ऑक्‍टोबरला संसदेला घेराव करून शेतकऱ्यांचे प्रश्‍न सरकार दरबारी मांडणार असल्याचे नाना पटोले यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत खराब झाल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. कॉंग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांच्याकडे प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्षपद दिले होते. त्यानंतरही त्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्यासाठी शेती व शेतमजूर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. संसदेला घेराव करण्यासाठी देशभरातून शेतकरी दिल्लीला जाणार आहेत. 

काही दिवसांपूर्वी दिल्ली जाणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करण्यात आला होता. आता पुन्हा कॉंग्रेसतर्फे संसदेला घेराव करण्याचे ठरविल्याने येत्या 23 ऑक्‍टोबरला होणाऱ्या संसद घेराव आंदोलनातून पटोले यांची राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. 

संबंधित लेख