nagpure muncipal commisioner | Sarkarnama

  नागपूरच्या आयुक्तांविरुद्ध अविश्‍वास ठरावावर विरजण ? 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

नागपूर ः नागपूर महापालिकेचे आयुक्त विरेंद्र सिंग यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फारसे उत्सुक नसल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्‍यता आहे. 

नागपूर ः नागपूर महापालिकेचे आयुक्त विरेंद्र सिंग यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फारसे उत्सुक नसल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्‍यता आहे. 

गेल्या काही दिवसांपासून नागपुरात अतिक्रमण हटाव मोहिम जोरदारपणे सुरू आहे. रस्त्यावर असलेली अतिक्रमणे पाडण्याचे काम सुरू आहे. या कारवाईत सर्वच समाजाची काही प्रार्थना स्थळे तोडण्यात आली. यामुळे स्थानिक नेत्यांनी आक्रोश सुरू केला. या कारवाईच्या विरोधात कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी आवाज उठविल्यानंतर लोकांचे चांगलेच समर्थन मिळाले. जनमानस विरोधात जात असल्याचे पाहून भाजपच्या नेत्यांनी या आंदोलनात उडी घेतली. 

भाजपचे महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात आंदोलने झाली. या आंदोलनानंतर आयुक्तांनी अतिक्रमण कारवाई सुरूच ठेवल्याने भाजपच्या नेत्यांची काहीच चालले नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे कारवाई होत असल्याचे सांगून आयुक्तांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना समजावून सांगितले. 

महापालिका आयुक्त ऐकत नसल्याचे पाहून अविश्‍वास ठराव आणण्याचे सुतोवाच भाजप नेत्यांनी केले. यासाठी संदीप जोशी व प्रवीण दटके या नेत्यांनी पुढाकार घेतला होता. भाजपच्या या नेत्यांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून मात्र अद्यापही फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. विरेंद्र सिंग हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्‍वासातील आहेत. 

विरेंद्र सिंग नागपुरात येण्यास उत्सुक नसतानाही महापालिकेची आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी विरेंद्र सिंग यांना खास नागपूरला पाठविण्यात आले आहे. विरेंद्र सिंग यांनी तीन-चार महिन्यापूर्वीच आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रतिसाद न मिळाल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या आविश्‍वास ठराव आणण्याचा प्रस्तावच बारगळण्याची शक्‍यता आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख