Nagpur woman's congress president Takshshila in Nagraj Manjul's movie | Sarkarnama

नागपूर महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा तक्षशीला, नागराज मंजुळेंच्या चित्रपटात 

केवल जीवनतारे 
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

नागराज मंजुळे यांचा नुकताच प्रदर्शित झालेल्या ' नाळ' या चित्रपटात नागपुरातील कॉंग्रेसच्या नेत्या तक्षशीला वाघधरे यांनी अभिनय केला आहे.

नागपूर :  चित्रपट व रंगभूमीमध्ये प्रसिद्धी मिळाल्यानंतर राजकारणात येणारे अनेक कलावंत आहेत. परंतु राजकारणात राहूनही अभिनयाची आवड नागपुरातील कॉंग्रेसच्या नेत्या तक्षशीला वाघधरे यांनी कायम ठेवली. 

नागराज मंजुळे यांचा नुकताच प्रदर्शित झालेल्या ' नाळ' या चित्रपटात नागपुरातील कॉंग्रेसच्या नेत्या तक्षशीला वाघधरे यांनी अभिनय केला आहे. त्या नागपूर जिल्हा महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा आहेत. 'नाळ' चित्रपटात 'बच्चन' नावाचा लहान मुलगा अभिनय करीत आहे. या 'बच्चन'च्या आईची भूमिका तक्षशीला वाघधरे यांनी केली आहे. 

तक्षशीला वाघधरे या राजकारणात असल्या तरी त्या महाविद्यालयीन जीवनापासून रंगभूमीशी जुळलेल्या आहेत. अनेक राज्य नाट्य महोत्सवातही त्यांनी काम केले आहे तसेच त्यांना उत्कृष्ट अभिनयाचे अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. पथनाट्य चळवळीतही त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. तसेच संवेदनशील लेखिका म्हणून विदर्भात त्यांचे नाव आहे. 

तक्षशीला वाघधरे या महाविद्यालयीन जीवनापासून नाट्यमहोत्सवातील नाटकांमध्ये अभिनय करीत असताना कॉंग्रेस पक्षातही सक्रिय झाल्या होत्या. त्या नागपूर जिल्हा परिषदेत निवडूनही आल्या होत्या. त्या आता उमरेड या विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसच्या संभाव्य उमेदवार आहेत. 

या प्रवासाबद्दल बोलताना तक्षशीला वाघधरे 'सरकारनामा'शी बोलताना म्हणाल्या, " रंगभूमीशी मी अगदी लहानपणापासून जुळलेली आहे. परंतु चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली नव्हती. नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी मी साधली. एका चांगल्या चित्रपटात काम केल्याचे समाधान निश्‍चितपणे मला मिळाले."

संबंधित लेख