nagpur-shrihari-ane-on-congress-stage | Sarkarnama

कॉंग्रेसच्या व्यासपीठावर ऍड. श्रीहरी अणे 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांनी कॉंग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

नागपूर : राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांनी कॉंग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

समाजातील बुद्धीजिवींना जोडण्यासाठी कॉंग्रेसने अखिल भारतीय प्रोफेशनल कॉंग्रेसची स्थापना केली आहे. प्रोफेशनल कॉंग्रेसचे नेतृत्व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार शशी थरूर यांच्याकडे आहे. 
नागपुरातील बुद्धीजिवींशी चर्चा करण्यासाठी नागपुरात नुकताच कार्यक्रम पार पडला. यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री कपिल सिब्बल नागपुरात आले होते. "लोकशाहीसमोरील आव्हाने' हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी कपिल सिब्बल यांच्यासोबत श्रीहरी अणे एक वक्ता होते. यावेळी कॉंग्रेसचे संजय झा उपस्थित होते. 

श्रीहरी अणे यांनी कॉंग्रेसच्या व्यासपीठावर हजेरी लावल्याने राजकीय अर्थ काढला जात आहे. श्रीहरी अणे यांचे आजोबा बापूजी अणे यांनी कॉंग्रेसचे अध्यक्षपद भूषविले आहे. तसेच ते बिहारचे राज्यपालही होते. त्यांचे कुटुंब कॉंग्रेस पक्षाशी जुळलेले होते. 

नागपुरातील कॉंग्रेस गटबाजीने पोखरलेली असल्याने एखादा अराजकीय व्यक्ती नागपूर लोकसभा मतदारसंघात द्यावा, यावर कॉंग्रेस श्रेष्ठी विचार करू शकते. श्रीहरी अणे विदर्भ राज्य आघाडीचे (विरा) अध्यक्षही आहेत. श्रीहरी अणे देशातील ज्येष्ठ विधिज्ञ आहेत; तसेच त्यांचा राज्यघटनेवरील सखोल अभ्यास असल्यामुळे त्यांना प्रोफेशनल कॉंग्रेसने व्यासपीठावर बोलाविले होते. यामागे कोणताही राजकीय अर्थ नाही. परंतु राजकारणात काहीही घडू शकते, असे विदर्भ राज्य आघाडीचे नेते संदेश सिंगलकर यांनी `सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

    
 

संबंधित लेख