nagpur-shivsena-wins-bhadravati-council-election | Sarkarnama

भद्रावतीत आवाज शिवसेनेचाच, भाजपला जबर हादरा 

श्रीकांत पेशेट्टीवार
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

गेल्या 15 वर्षांपासून शिवसेनेची एकहाती सत्ता असलेल्या भद्रावती (जि. चंद्रपूर) नगर परिषदेवर पुन्हा शिवसेनेचे अनिल धानोरकर निवडून आल्याने भद्रावतीत शिवसेनेची पकड मजबूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

चंद्रपूर : गेल्या 15 वर्षांपासून शिवसेनेची एकहाती सत्ता असलेल्या भद्रावती (जि. चंद्रपूर) नगर परिषदेवर पुन्हा शिवसेनेचे अनिल धानोरकर निवडून आल्याने भद्रावतीत शिवसेनेची पकड मजबूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

भद्रावती येथे नगर परिषद स्थापन झाल्यापासून शिवसेनेचा नगराध्यक्ष राहिला आहे. शिवसेनेचे आमदार बाळू (सुरेश) धानोरकर पहिल्यांदा निवडून आले. यानंतर सेनेचे संघटन पुन्हा मजबूत झाले आहे. यावेळी नगराध्यक्षपदासाठी आमदार धानोरकर यांनी आपल्या भावाला उमेदवारी दिली होती. आमदार धानोरकर यांनी केलेल्या विकास कामांच्या भरवशावर अनिल धानोरकर निवडून आल्याचे बोलले जात आहे. 

या निवडणुकीत भाजप झेंडा रोवेल, असे बोलले जात होते. भाजपच्या "चाणक्‍यां'नी ऐनवेळी शिवसेनेचे नेते व भद्रावतीचे पहिले नगराध्यक्ष किशोर नामोजवार यांना भाजपच्या तंबूत आणले व त्यांना अध्यक्षपदाची उमेदवारीही दिली. परंतु ऐनवेळी आलेल्या नामोजवार यांना शिवसेनेचा गड भेदता आला नाही. त्यांचा 8 हजारपेक्षा अधिक मताधिक्‍यांनी पराभव झाला. एकूण 27 सदस्यांच्या या नगरपालिकेत भाजपचे केवळ तीन सदस्य निवडून आले. कॉंग्रेसला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले. या दोन्ही राष्ट्रीय पक्षांपेक्षा भारिप-बहुजन महासंघाने चार जागा पटकावून आपले अस्तित्व दाखवून दिले.
 
भद्रावती येथील विजयाबद्दल बोलताना आमदार बाळू धानोरकर म्हणाले, की शिवसेनेने गेल्या 15 वर्षांपासून भद्रावतीकरांचा विश्‍वास संपादन केला आहे. विकास कामे केल्याने पुन्हा मतदारांनी सेनेला निवडून दिले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख