अखेर नागपुरातून लढणारा `वाघ' शिवसेनेला मिळाला? 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर एकानेही शिवसैनिकाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपुरातून लोकसभा लढण्यास तयारी दर्शविली नव्हती. आता माजी उपमहापौर शेखर सावरबांधे यांनी तयारी चालविली आहे. यासाठी शिवसेनेच्या एका गटाने जोरदार लॉबिंग सुरू केले आहे.
अखेर नागपुरातून लढणारा `वाघ' शिवसेनेला मिळाला? 

नागपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर एकानेही शिवसैनिकाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपुरातून लोकसभा लढण्यास तयारी दर्शविली नव्हती. आता माजी उपमहापौर शेखर सावरबांधे यांनी तयारी चालविली आहे. यासाठी शिवसेनेच्या एका गटाने जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. 

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी पूर्व विदर्भातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला होता. यावेळी नागपुरातील लोकसभा लढण्यास एकाही शिवसैनिकाने तयारी दाखविली नव्हती. नागपुरातून लोकसभा निवडणूक कोण लढणार? असा प्रश्‍न उद्धव ठाकरे यांनी विचारल्यानंतर शिवसैनिकांच्या आघाडीवर शांतता पसरली होती. यामुळे उद्धव ठाकरे यांची चांगलीच पंचाईत झाली होती. गडकरीसारख्या हेवीवेट नेत्याच्या विरोधात लढण्यास कुणीही तयार नसल्याचे चित्र समोर आले होते. एकही शिवसैनिक नागपुरातून लोकसभा निवडणूक लढण्यास तयार नसल्यास आम्हाला दुसरीकडून उमेदवार आयात करावा लागेल, असा सूचक इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता. 

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत नाराज असलेल्या शेखर सावरबांधे यांचे नाव आता पुढे आले आहे. नागपूर शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव यांना शह देण्यासाठी सावरबांधे यांचे नाव पुढे केल्याचे समजते. दोनवेळा विधानसभेची उमेदवारी शिवसेनेने नाकारल्यामुळे शेखर सावरबांधे नाराज आहेत. मूळ कॉंग्रेसचे असलेले सावरबांधे यांची प्रतिमा एक अभ्यासू राजकीय नेता म्हणून आहे. गटतटाच्या राजकारणात प्रत्येकवेळी सावरबांधे यांचा नागपुरातील काही शिवसेना नेत्यांनी "गेम' केल्याचे बोलले जात आहे. सावरबांधे यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या प्रतिमेचा फायदा शिवसेनेला होऊ शकतो. तसेच ते तेली समाजाचे असल्याने या समाजाला शिवसेनेकडे वळविण्यास फायदा होऊ शकतो, असा दावा केला जात आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com