nagpur-rajkumar-badole-shramner-diksha | Sarkarnama

सामाजिक न्यायमंत्री बडोलेंनी घेतली थायलंडमध्ये श्रामणेर दीक्षा 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी अचानकपणे थायलंडमध्ये जाऊन श्रामणेर दीक्षा घेतली. 
बडोलेंनी चिवर घालून घेतलेली छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहेत. 

नागपूर : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी अचानकपणे थायलंडमध्ये जाऊन श्रामणेर दीक्षा घेतली. बडोलेंनी चिवर घालून घेतलेली छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहेत. 

अंगावर काषाय वस्त्र धारण करून त्रिशरणासह दसशील भिक्‍खूकडून त्यांनी दीक्षा ग्रहण केली. ही दीक्षा ग्रहण करून त्यांनी थायलंड येथील संघात प्रवेश केला.

राजकुमार बडोले हे तिरोडा (जि. गोंदिया) मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते व्यवसायाने इंजिनियर आहेत. इंजिनियर असताना त्यांनी काही वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केला.

बडोले सध्या थायलंडमध्ये असून त्यांनी श्रामणेर दीक्षा घेतल्यानंतर घेतलेली छायाचित्र सोशल मिडीयावर टाकली आहेत. जवळपास दोन आठवडे ते थायलंडमध्ये राहणार असून बौद्ध धम्मात दिलेल्या शिकवणीचे पालन ते करणार आहेत. 

भिक्‍खू जीवनाशी ते एकरूप होणार आहेत. श्रामणेर दीक्षा घेणाऱ्याला भंते म्हटले जाते. त्यांच्या नाव बदलले जाते. बौद्ध संस्कृतीशी मिळतेजुळते नाव दिले जाते. श्रामणेर यांना भिक्‍खू संघाद्वारे उपसंपदा दिल्यानंतरच त्यांना भिक्‍खू म्हटले जाते. येत्या 7 ऑगस्टला ते भारतात परतणार आहेत.

संबंधित लेख