nagpur-priyanka-chaturvedi-rafeal-maharashtra-government | Sarkarnama

राफेल सौद्यात राज्य सरकारही `भागीदार' : कॉंग्रेस प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी

सरकारनामा ब्युरो
रविवार, 12 ऑगस्ट 2018

देशात सध्या गाजत असलेल्या राफेल संरक्षण सौद्यात महाराष्ट्र सरकारने नागपूर येथील `मिहान'मधील शेकडो हेक्‍टर जागा रिलायंस एरोस्पेस कंपनीला दिली आहे. केंद्र सरकारच्या या घोटाळ्यात महाराष्ट्र सरकारही भागीदार असल्याचे आता स्पष्ट झाल्याचा आरोप कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी आज नागपुरात केला.

नागपूर : देशात सध्या गाजत असलेल्या राफेल संरक्षण सौद्यात महाराष्ट्र सरकारने नागपूर येथील `मिहान'मधील शेकडो हेक्‍टर जागा रिलायंस एरोस्पेस कंपनीला दिली आहे. केंद्र सरकारच्या या घोटाळ्यात महाराष्ट्र सरकारही भागीदार असल्याचे आता स्पष्ट झाल्याचा आरोप कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी आज नागपुरात केला.
 
नागपूर पत्रकार संघाने आयोजित केलेल्या `मीट दी प्रेस' कार्यक्रमात बोलताना प्रियंका चतुर्वेदी यांनी सध्या गाजत असलेल्या राफेल विमान खरेदीमध्ये मोठ्या गैरव्यवहार झाल्याचा केंद्र सरकारवर आरोप केला. या सौद्यातील सत्य बाहेर येण्यासाठी या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) स्थापन करावी, अशी मागणी करून त्या म्हणाल्या, की यूपीए सरकारने राफेल विमाने खरेदीचा व्यवहार हा देशाचे हित समोर ठेऊन केला होता. यात देशातील सार्वजिक उपक्रमाअंतर्गत असलेली संस्था हिंदुस्थान एरोनॉटीकल लिमीटेडला (एचएएल) काम दिले होते. यात संपूर्ण पारदर्शकता होती. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर लगेच हा करार रद्द करून जी कंपनी अस्तित्वात नव्हती, त्या रिलायंसच्या कंपनीला या सौद्यात भागीदार करून घेतले. हा प्रकारच संशय निर्माण करणारा आहे. देश हिताचा प्रश्‍न असल्याने या सौद्याची `जेपीसी'मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी असल्याचे चतुर्वेदी यांनी सांगितले. 

उद्योजक अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायंस एरोस्पेस या कंपनीला नागपुरात शेकडो एकर जागा दिल्याचा आरोप करून चतुर्वेदी म्हणाल्या, की राज्य सरकारने अत्यंत कमी वेळात ही जागा उपलब्ध करून दिली आहे. रिलायंसला जागा मिळाल्यानंतर या कंपनीची स्थापना झाली आहे. 

रिलायंस एरोस्पेसवर एवढी मेहेरनजर कशासाठी? असा सवाल करून त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रभावाने ही जमीन मिळाल्याचे स्पष्ट असल्याने या सौद्यात महाराष्ट्र सरकारही सामील असल्याचे स्पष्ट झाल्याचा आरोप चतुर्वेदी यांनी केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख