Nagpur politics : bad cement roads | Sarkarnama

नागपुरातील सिमेंट रस्त्यांची "पोलखोल' भाजपला मान्य? 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 9 मे 2017

नागपुरातील सिमेंट रस्त्यांच्या बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याची कबुली महापालिकेतील सत्ता पक्षनेते संदीप जोशी यांनी दिली आहे. 

नागपूर : नागपुरातील सिमेंट रस्त्यांच्या बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याची कबुली महापालिकेतील सत्ता पक्षनेते संदीप जोशी यांनी दिली आहे. 

नागपुरातील मोठ्याप्रमाणावर सिमेंट रस्त्यांचे काम सुरू आहे. जवळपास 600 कोटी रुपये खर्च करून सिमेंटचे रस्ते तयार केले जात आहे. या रस्त्यांच्या बांधकामाचा दर्जा चांगला नसल्याचा आरोप जनमंच या स्वयंसेवी संस्थेने केला आहे. या संस्थेने सिमेंट रस्त्यांची पाहणी केली. यात अनेक रस्त्यांना भेगा पडल्याचे दिसून आले. संपूर्ण शहरात जवळपास पावणेतीनशे ठिकाणी रस्त्यांना भेगा पडल्याचा दावा जनमंच संस्थेने केला आहे. 

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सिमेंट रस्त्यांची पाहणी केली. बावनकुळे यांनीही सिमेंट रस्ते निकृष्ट असल्याचे मान्य करून महापालिका आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत. महापालिकातील सत्तारूढ पक्षनेते संदीप जोशी यांनी पत्रकार परिषद घेऊन सिमेंट रस्त्यांचा दर्जा चांगला नसल्याचे मान्य केले. याला जबाबदार असलेल्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा जोशी यांनी केली. यामुळे जनमंच संस्थेने नागपुरातील सिमेंट रस्त्यांची केलेली पोलखोल मान्य असल्याची कबुली जोशी यांनी दिली आहे. 

अधिकाऱ्यांचा अजब युक्तिवाद 
महापालिकेचे अधिकारीही या वेळी हजर होते. काही महिन्यांपूर्वी रेशीमबाग परिसरातील रस्त्याला भेगा पडल्याने यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. रस्त्यांना भेगा पडणे ही बाब गंभीर नसून सिमेंट रस्त्यांना असे होत असते. त्यामुळे भेगा पडलेल्या रस्त्यांच्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची गरज नसल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. एके ठिकाणी रस्त्याला भेगा पडल्या तर कारवाई होणार दुसऱ्या ठिकाणी कारवाई होणार नाही, यामागे अधिकाऱ्यांचा कोणता तर्क आहे, हे समजण्यापलिकडे आहे. 

संबंधित लेख