nagpur politics | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांचे शहर स्वच्छतेत नापास 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 6 मे 2017

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गाव असलेले व विकासाचे अनेक प्रकल्प सुरू असलेल्या नागपूर शहराचा स्वच्छतेत क्रमांक 20 वरून 137 वर घसरगुंडी झाली आहे. यामुळे महापालिका प्रशासनाच्या कामावर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. 

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गाव असलेले व विकासाचे अनेक प्रकल्प सुरू असलेल्या नागपूर शहराचा स्वच्छतेत क्रमांक 20 वरून 137 वर घसरगुंडी झाली आहे. यामुळे महापालिका प्रशासनाच्या कामावर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. 

गेल्या वर्षी झालेल्या स्वच्छता सर्वेक्षणात देशात नागपूरचा क्रमांक 20 वा होता. त्यावेळी नागपूर महापालिकेने मोठ्या प्रमाणावर डंका पिटला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे यश म्हणून मोठमोठ्या जाहिराती झळकल्या होत्या. गेल्या 17 जानेवारीला केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या 43 सदस्यीय पथकाने नागपूरची पाहणी केली. केंद्रीय नगरविकास मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी जाहीर केलेल्या यादीत नागपूरची स्वच्छता देशात 137 क्रमांकावर जाऊन थांबली आहे. केवळ एका वर्षात नागपूर 117 क्रमांकाने खाली गेला आहे. 

विकासकामांच्या भूमिपूजनांचा सपाटा गेल्या एक वर्षात लावला होता. याचवेळी नागपूर शहर प्रशासनाने शहराच्या स्वच्छतेकडे पार दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात रस्तोरस्ती कचऱ्यांचे ढिगारे दिसून येते. तसेच नागपूर शहरातील डंपिंग यार्डचा प्रश्‍नही सुटलेला नाही. भांडेवाडी परिसरात नागपुरातील कचरा साठविला जातो. या परिसरातील प्रदूषण वाढले आहे तसेच नियमितपणे या डम्पिंग यार्डमध्ये आग लागण्याच्या घटना होत असतात. याकडे महापालिकेने पार दुर्लक्ष केल्याने शहरातील स्वच्छता धोक्‍यात आली आहे. 

संबंधित लेख