Nagpur politics | Sarkarnama

डॉ. जोशी यांचे संघभूमीला कोणते साकडे? 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 24 एप्रिल 2017

भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. डॉ. जोशी यांनी संघभूमीकडे कोणते साकडे घातले? याबाबत तर्क लावला जात आहे. 

नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. डॉ. जोशी यांनी संघभूमीकडे कोणते साकडे घातले? याबाबत तर्क लावला जात आहे. 

बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने खटला चालविण्याचे निर्देश दिल्यानंतर डॉ. जोशी यांची रा. स्व. संघ मुख्यालयाला दिलेली ही पहिलीच भेट आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी, डॉ. मुरलीमनोहर जोशी व केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्याविरोधात बाबरी मशीद पाडण्याचा कट रचल्याचा आरोपाखाली खटला चालविण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने या नेत्यांच्या राजकीय भवितव्यावरच प्रश्‍नचिन्ह लागले आहे. 

लालकृष्ण अडवानी व डॉ. मुरली मनोहर जोशी यांची नावे जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपतीपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चिले जात होते. ही चर्चा सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने सारेच राजकीय गणिते बिघडली आहेत. या पार्श्‍वभूमीवर डॉ. जोशी यांनी नागपुरात धाव घेतल्याने वेगवेगळे राजकीय अर्थ लावले जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची डॉ. जोशी यांनी जवळपास दीड तास चर्चा केली. डॉ. जोशी यांनी सरसंघचालकांकडे कोणते साकडे घातले, याबद्दल डॉ. जोशी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला. डॉ. भागवत व डॉ. जोशी यांच्यात झालेल्या भेटीच्यावेळी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार व बाबरी मशीद प्रकरणाचा प्रामुख्याने समावेश होता, असे बोलले जात आहे. 

संबंधित लेख