nagpur politics | Sarkarnama

पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी बावनकुळेंकडून अधिकाऱयांची झाडाझडती

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 एप्रिल 2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा निर्विघ्न होण्यासाठी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा बैठक घेतली. यात महसूल, पोलिस व ऊर्जा खात्याच्या अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. 

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा निर्विघ्न होण्यासाठी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा बैठक घेतली. यात महसूल, पोलिस व ऊर्जा खात्याच्या अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. 

येत्या 14 एप्रिलला पंतप्रधान एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर येत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ते दीक्षाभूमी येथे जाऊन अभिवादन करतील. तेथून ते कोराडी येथील औष्णिक वीज केंद्रातील नव्या युनिटचे भूमिपूजन करणार आहेत. तसेच डीजी धन मेळाव्यात ते मार्गदर्शन करणार आहेत. कॅशलेस व्यवहारासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा व उद्योजकांचा सत्कार पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. 

पंतप्रधान नागपुरात जवळपास दोन तास थांबणार आहेत. हा दौरा कोणतेही विघ्न न येता पूर्ण व्हावा, यासाठी बावनकुळे यांनी नुकतीच अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यात अधिकाऱ्यांवर बावनकुळे बरेच उखडल्याचे समजते. अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यक्रमातच वीज "गुल' होण्याचे प्रकार नागपुरात घडले आहेत. या अनुभव लक्षात घेऊन पंतप्रधानांच्या दौऱ्यात असा प्रकार झाला तर "याद राखा' असा दम बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना दिल्याचे समजते. अधिकाऱ्यांनी यावर उपाय शोधून काढला. ज्या ठिकाणी पंतप्रधानांचा कार्यक्रम होणार आहे. त्या परिसरातील डीपी बदलण्याचा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी दिला. या नव्या प्रस्तावाला मंत्र्यांनी तत्काळ मंजुरी दिली. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शाब्दिक झाडाझडतीने अधिकारी चांगलेच धास्तावले असल्याचे समजते. 

संबंधित लेख