nagpur-obc-meet-mumbai | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांच्या दिमतीला विदर्भातील ओबीसी नेते?

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 23 जुलै 2018

आरक्षणाच्या मुद्यांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचे काम सुरू असताना विदर्भातील ओबीसी नेत्यांनी येत्या 7 ऑगस्टला मुंबईत ओबीसींचा महामेळावा घेण्याचे ठरविले आहे. 

नागपूर : आरक्षणाच्या मुद्यांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचे काम सुरू असताना विदर्भातील ओबीसी नेत्यांनी येत्या 7 ऑगस्टला मुंबईत ओबीसींचा महामेळावा घेण्याचे ठरविले आहे. 

राजकीय दृष्टीने हा मेळावा महत्त्वाचा असून या मेळाव्याला सर्वच राजकीय पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. 

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक होते. मराठ्यांना आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर हा मुद्या शांत झालेला नाही. मराठा आंदोलकांनी आषाढी महापूजेला अटकाव करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांना दिला होता. या इशाऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर येथील शासकीय महापूजेला न जाण्याचा निर्णय घेतला. 

हा मुद्दा तापलेला असताना विदर्भातील ओबीसी नेते आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत ओबीसी मेळावा घेणार आहेत. विदर्भातील राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे हा मेळावा होणार आहे. या संघटनेत सर्व राजकीय पक्षांचे ओबीसी समाजातील नेते आहे. 

या संघटनेचे अध्यक्ष कॉंग्रेसचे प्रदेश महासचिव प्राचार्य बबनराव तायवाडे आहेत तर भाजपचे नेते व माजी खासदार खुशाल बोपचे या संघटनेचे महासचिव आहेत. याशिवाय सर्वच राजकीय पक्षांचे नेते या संघटनेत आहेत. 

ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी येत्या 7 ऑगस्टला हा मेळावा मुंबईतील हाजी अलीजवळील स्पोर्ट कॉम्प्लेक्‍समध्ये होणार आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. 

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हजेरी लावणार आहेत. या मेळाव्याला विदर्भातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते मुंबईला जाणार आहेत.

संबंधित लेख