nagpur-nitin-gadkari-narendra-modi-adityanath | Sarkarnama

नितीन गडकरी यांच्या `ऍग्रोव्हिजन'च्या उद्घाटनाला नरेंद्र मोदी उपस्थित राहणार

सरकारनामा ब्युरो
रविवार, 29 जुलै 2018

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने होणाऱ्या ऍग्रोव्हिजन या कृषी प्रदर्शनाच्या उद्‌घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहेत. यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बोलाविले जाणार आहे. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच नागपुरात येणार आहेत.

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने होणाऱ्या ऍग्रोव्हिजन या कृषी प्रदर्शनाच्या उद्‌घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहेत. यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बोलाविले जाणार आहे. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच नागपुरात येणार आहेत.
 
पूर्ती उद्योग समुहातर्फे दरवर्षी ऍग्रोव्हिजन कृषी प्रदर्शन नागपुरात भरविले जाते. यात देशभरातील कृषी क्षेत्रातील उद्योजक, नावीन्यपूर्ण प्रयोग करणारे शेतकरी व शेतीसाठी नवे नवे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणाऱ्या संस्था या प्रदर्शनात सहभागी होतात. 

हे प्रदर्शन पाहण्यासाठी विदर्भ, मध्य प्रदेश व छत्तीसगडमधून शेतकरी मोठ्याप्रमाणावर नागपुरात येतात.
 
निवडणूक आचारसंहितेमुळे प्रदर्शन लवकर? 
दरवर्षी हे प्रदर्शन डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात घेतले जाते. यावर्षी लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर आलेल्या असताना ऍग्रोव्हिजन प्रदर्शन नोव्हेंबर महिन्यातच घेतले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता डिसेंबर महिन्यात लागण्याची शक्‍यता लक्षात घेऊन हे प्रदर्शन एक महिना अगोदर आयोजित केले जात असल्याची चर्चा आहे. 

या प्रदर्शनासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागाचा सक्रिय सहभाग असतो. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यास या विभागांना या प्रदर्शना सहभागी होता येणार नाही, हे उघड आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभाही नागपुरात होणार आहे. भाजपचे स्टार प्रचार असलेले उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्यासोबतीला बोलाविले जाणार आहे. 

यामुळे हा उद्‌घाटन समारंभ निवडणुकीच्या प्रचाराची रंगीत तालिम असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित लेख