Nagpur news - Nana Patole | Sarkarnama

पंतप्रधान खासदारांना बोलूच देत नाहीत : नाना पटोले

सुरेश भुसारी
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांना बोलूच देत नाहीत, असा गंभीर आरोप भाजपचे खासदार नाना पटोले यांनी आज नागपुरात केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान साधत महाराष्ट्र दिल्लीतून निधी आणण्यास सक्षम नसल्याचे सांगून भाजपला घरचा अहेर दिला आहे.

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांना बोलूच देत नाहीत, असा गंभीर आरोप भाजपचे खासदार नाना पटोले यांनी आज नागपुरात केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान साधत महाराष्ट्र दिल्लीतून निधी आणण्यास सक्षम नसल्याचे सांगून भाजपला घरचा अहेर दिला आहे.

ऍग्रोव्हेट व ऍग्रो इंजीनिअरिंग मित्र परिवारतर्फे आयोजित विदर्भातील सिंचन सुविधा आणि शेतकऱ्यांचे अश्रू या विषयावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अतिथीगृहात परिसंवाद आयोजित केला होता. त्या प्रसंगी ते बोलत होते.

पंतप्रधानांनी बोलाविलेल्या खासदारांच्या बैठकीचा वृत्तांत विषद करताना खासदार पटोले म्हणाले, संसदेच्या अधिवेशानापूर्वी पंतप्रधानांनी भाजपच्या खासदारांशी संवाद साधला होता. या बैठकीत शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेण्यासंदर्भात तसेच केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय सुरू करण्याची मागणी केली. या बैठकीत पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्याऐवजी तुम्हाला सरकारी योजनांची माहिती आहे काय? अशी विचारणा करून मला गुपचूप राहण्यास सांगितल्याचे खासदार पटोले म्हणाले. 

यावेळी खासदार पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरह निशाना साधला. महाराष्ट्राच्या विकासाकरीता केंद्रातून पैसा आणण्यासाठी जी मानसिकता लागते, ती मानसिकता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली. 

महाराष्ट्र सदनात बसलेला अधिकारी राज्याचे प्रस्ताव केंद्राकडे पोहोचविण्यातही अपयशी पडतो, असा आरोप करून नाना पटोले म्हणाले, की, लोकसभा अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री राज्यातील खासदारांची बैठक बोलवित होते. पण आम्ही मुख्यमंत्र्यांकडे महाराष्ट्रात आपण पैसा मागण्यात कमी पडता, अशा वेदना व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलाविणेच बंद केले, असेही त्यांनी सांगितले. यावरून राज्य सरकारला विकासाची किती कळकळ आहे, हे स्पष्ट होते. केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाबाबत आत्मियता नाही. सध्या तर राज्यातील व केंद्रातील सर्वच मंत्री स्वतः शास्त्रज्ञ झाल्याच्या तोऱ्यात वागतात. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असताना आम्ही दिल्लीतून बघतो तेव्हा महाराष्ट्र भिकारी असल्याचे दिसून येत असल्याचा टोला त्यांनी हाणला.

गोसेखुर्द प्रकल्पाचे ठेकेदारच आता खासदार-आमदार झाल्यामुळे यातील भ्रष्टाचार कोण बाहेर काढणार, आम्ही सत्तेवर येण्यापूर्वी भ्रष्टाचार केलेल्या ठेकेदारांकडून पैसा वसूल करू असे जनतेला आश्‍वासन दिले होते. पण एकही पैसा आम्ही वसूल करू शकलो नाही, ही शोकांतिका असल्याचे त्यांनी सांगितले.
 

संबंधित लेख