Nagpur News : BJP mla's absent to Yoga | Sarkarnama

नागपुरातील भाजप आमदारांची योगदिनाला दांडी 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 21 जून 2017

जागतिक योग दिनानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. परंतु नागपुरातील भाजपच्या आमदारांनी मात्र या योगदिनाला दांडी मारली. नागपुरातील सहा आमदारांपैकी केवळ एकच आमदार या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

नागपूर : जागतिक योग दिनानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. परंतु नागपुरातील भाजपच्या आमदारांनी मात्र या योगदिनाला दांडी मारली. नागपुरातील सहा आमदारांपैकी केवळ एकच आमदार या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्देशानुसार 21 जून जागतिक योग दिन म्हणून गेल्या दोन वर्षांपासून साजरा केला जात आहे. यावर्षीही नागपुरात जंगी आयोजन करण्यात आले होते. नागपूर महापालिकेने विशेष पुढाकार घेत नागपुरातील यशवंत स्टेडियममध्ये योगदिनाचा कार्यक्रम भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला. यावेळी जवळपास 10 हजार लोकांनी एकाचवेळी आसने केली. यावेळी प्रामुख्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, महापौर नंदा जिचकार यांच्यासह शहरातील भाजपचे सर्व आमदार उपस्थित होते. या मुख्य कार्यक्रमात शहरातील भाजपचे आमदार मात्र उपस्थित नव्हते. 

नागपुरातील आमदार कृष्णा खोपडे (पूर्व नागपूर), भाजपचे शहर अध्यक्ष व आमदार सुधाकर कोहळे (दक्षिण नागपूर), डॉ. मिलिंद माने (उत्तर नागपूर) व आमदार विकास कुंभारे (मध्य नागपूर) हे आमदार अनुपस्थित राहिले. पश्‍चिम नागपूरचे आमदार सुधाकर देशमुख यांनी मात्र हजेरी लावली होती. 

योग दिनाच्या कार्यक्रमात राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्ते, सरकारी अधिकारी व पोलिस कर्मचारीही सामील झाले होते. शाळांना उन्हाळी सुट्या असल्याने शाळांमध्ये योग दिन साजरा होऊ शकला नाही. शहरात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग मोठा असतो. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, यासाठी शाळा प्रशासनाला ताकीद दिली जाते. परंतु विदर्भातील शाळा 27 जूनपासून सुरू होणार असल्याने जागतिक योग दिनाच्या दिवशी नागपूर शहरातील शाळा ओस पडल्या होत्या. विद्यार्थ्यांची कमतरता यावेळी सरकारी कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी भरून काढली. सरकारी कर्मचारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. 

संबंधित लेख