समृद्धी महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

समृद्धी महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

मुंबई  : राज्यात अनेक प्रकल्प उभारताना शेतकऱ्यांना गृहीत धरले जात असून, सरकारकडून कायदे धाब्यावर बसवून शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. राज्यात समृद्धी महामार्गाच्या नावाखाली नागपूरपासून ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याच्या प्रक्रियेला सुरवात केली जात आहे. 10 जिल्ह्यातून सुमारे 710 किमी लांबीच्या महामार्गामुळे बाधित होणारे शेतकरी आता संघटित झाले असून, येत्या 29 एप्रिल रोजी ठाणे जिल्ह्यातील शहापूर या ठिकाणी हजारो शेतकरी आंदोलन करणार असल्याची माहिती शेतकरी जमीन बचाव समितीचे समन्वयक विश्‍वनाथ पाटील यांनी दिली. 

प्रकल्पांना कोणाचाही विरोध नाही. परंतु, एक ना अनेक प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याचे काम सरकारकडून नेहमी केले जाते. अनेक ठिकाणी पुनर्वसनाचे प्रश्‍न जटिल झालेला असतो तर, या प्रकल्पामुळे आतापर्यंत हजारो गावे विस्थापित झालेली आहे. एका बाजूला शेतीतून उत्पन्न मिळत नसताना शेतकरी हवालदिल असताना, दुसऱ्या बाजूला प्रकल्पाच्या नावाखाली सरकारकडून जमिनी ताब्यात घेतल्या जात असल्याने अनेक शेतकऱ्यांवर भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. गेल्या आठ महिन्यापूर्वी समृद्धी महामार्गाचे काम जलदगतीने व्हावे यासाठी प्रयत्न केले जात असून, कोणाच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा महामार्ग तयार केला जात आहे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध वाढत चालला आहे. विशेष म्हणजे या महामार्गाची रुंदी 120 मीटर असून दोन्ही बाजूला 100 मीटर अंतर सोडले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या सात बारावर जागेचे सर्व्हेक्षण केले जात असले तरी, त्यांना कोणतेही पूर्वसूचना नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

जमिनीचे मोजमाप लवकरच पूर्ण होणार 
समृद्धी महामार्गासाठी कोणती जमीन जाणार आहे, त्याचे मोजमाप करण्याचे काम सुरु आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यवाही सुरू होईल. नुकसान भरपाईची रक्कम ठरताना जिल्हाधिकारी कार्यालयांकडून ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. याप्रकरणात शेतकऱ्यांना निश्‍चित किती मोबदला दिला जाणार हे आता सांगता येणार नाही असे एमएसआरडीसी चे व्यवस्थापकीय संचालक राधेश्‍याम मोपलवार यांनी स्पष्ट केले 

शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यास विरोध 
समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यास आमचा विरोध आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यापूर्वी त्याला पूर्व सूचना देणे हे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु समृद्धी योजनेत मात्र जमीन ताब्यात घेत असताना पोलिस बळाचा वापर करण्यात आला. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या दडपशाहीचे धोरण याठिकाणी अवलंबले जात आहे. येत्या 29 तारखेला या सर्व प्रकाराच्या विरोधात शहापूर येथे सर्व पीडित शेतकरी आंदोलन करणार आहेत असे शेतकरी जमीन बचाव संघर्ष समितीचे समन्वयक विश्‍वनाथ पाटील यांनी सांगितले. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com