nagpur-monsson-session-snake-search | Sarkarnama

पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर नागपुरातील राजभवन, रविभवनात निघाले साप 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 25 जून 2018

पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या अधिवेशना दरम्यान पोलिस व सुरक्षा अधिकाऱ्यांना आता कायदा व सुव्यवस्थेसोबत सापांचाही बंदोबस्त करावा लागणार आहे. यासाठी खास सर्पमित्रांची मदत घेतली जाणार आहे.

नागपूर : पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या अधिवेशना दरम्यान पोलिस व सुरक्षा अधिकाऱ्यांना आता कायदा व सुव्यवस्थेसोबत सापांचाही बंदोबस्त करावा लागणार आहे. यासाठी खास सर्पमित्रांची मदत घेतली जाणार आहे.
 
येत्या 4 जुलैपासून नागपुरात पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनादरम्यान मंत्री व आमदारांच्या सुरक्षेसोबत शहरातील कायदा व सुव्यवस्था पाहावी लागते. यावेळी पावसाळ्यात अधिवेशन होत असल्याने सुरक्षा अधिकाऱ्यांना सापांवरही लक्ष ठेवावे लागणार आहे. 

राजभवन, रविभवन, आमदार निवास, विधान भवन हे सिव्हील लाईन्स परिसरात आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे आहेत. राजभवन तर अनेक एकरामध्ये विस्तारलेले आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर या भागात अनेकदा साप पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वीच रविभवन व राजभवनात साप आढळल्याने सर्पमित्रांना आणून सापांना पकडावे लागले. सर्पमित्र व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडून दिले. 

पावसाळी अधिवेशानानिमित्त संपूर्ण मंत्रिमंडळ आणि विधिमंडळ सचिवालय नागपूर येथे येणार असल्याने राजभवन, रामगिरी, देवगिरी, रविभवन, नागभवनाची देखभाल दुरूस्तीचे काम सुरू आहे. काही दिवसापूर्वी रविभवन आणि सरपंत भवन येथे साप दिसून आला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. 

पावसाळी अधिवेशन होत असल्याने दक्षता म्हणून सार्वजनिक बांधकम विभागाने `ऑपरेशन सर्च साप' मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला. यासाठ वन विभाग आणि सर्प मित्रांची मदत घेण्यात येत आहे. यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे. यात वनअधिकारी, सर्पमित्र विशाल डंबारे आणि दोन सहकाऱ्यांचा समावेश आहे.
राजकारणाच्या बित्तंबातम्यांसाठी डाऊनलोड करा sarkarnama अॅप 

संबंधित लेख