nagpur-mohan-bhagwat-warns-government-ram-temple | Sarkarnama

संयम संपला, आता राम मंदिरासाठी सरकारवर दबाव : सरसंघचालक डॉ. भागवत

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 नोव्हेंबर 2018

श्री राम मंदिरासाठी लढाई नाही, मात्र, अट्टाहास कायम ठेऊन सरकारवर दबाव निर्माण करण्याची गरज आहे. आतापर्यंत सरकारच्या आश्‍वासनामुळे संयम बाळगला. परंतु आता संयम संपला, असा इशारा देत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज संपूर्ण देशाला राम मंदिर बांधण्यासाठी एकत्र येऊन जनजागृती करण्याचे आवाहन केले. 

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परिसर (नागपूर) : श्री राम मंदिरासाठी लढाई नाही, मात्र, अट्टाहास कायम ठेऊन सरकारवर दबाव निर्माण करण्याची गरज आहे. आतापर्यंत सरकारच्या आश्‍वासनामुळे संयम बाळगला. परंतु आता संयम संपला, असा इशारा देत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज संपूर्ण देशाला राम मंदिर बांधण्यासाठी एकत्र येऊन जनजागृती करण्याचे आवाहन केले. 

सर्वोच्च न्यायालय टाळाटाळ करीत असेल तर कायदा करण्यासाठी विचार करावा, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला. 

विश्‍व हिंदू परिषदेतर्फे आज क्रीडा चौकातील ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर भव्य हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 
व्यासपीठावर जगतगुरू शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती महाराज, साध्वी ऋतुंभरा, जितेंद्रनाथ महाराज, विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष ऍड. आलोककुमार, विहिंपचे विदर्भ प्रांत अध्यक्ष राजेश्‍वर निवल, स्वागत समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकर, विहिंप शहर अध्यक्ष सुदर्शन शेंडे यांच्यासह विविध पंथातील संत उपस्थित होते. 

यावेळी डॉ. भागवत यांनी हिंदू समाज संयम बाळगत असल्याने राम मंदिरसाठीच्या लढ्याला तीस वर्षे लागल्याचे सांगितले. मात्र, आज सर्वोच्च न्यायालयही सत्य व न्याय टाळत आहे. अयोध्या हे रामजन्मभूमीचे स्थान आहे, हा निर्णय न्यायालयाने दिला होता. त्यामुळे मंदिर तेथे बनेल, या विश्‍वासावर प्रतीक्षा केली. परंतु सरकारनेही टाळले. आता राम मंदिर सर्वोच्च न्यायालयाच्या प्राथमिकतेवर नाही. म्हणून जागेच्या मालकीचा वाद उकरून काढला. राम मंदिर तेथे होते, हे सिद्ध झाले आहे. मात्र सुनावणी टाळली जात आहे. त्यामुळे सरकारने यासाठी कशाप्रकारे कायदा करता येईल, यावर विचार करावा, असे ते म्हणाले. 

कायदा करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याची गरज व्यक्त करीत त्यांनी विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष ऍड. आलोककुमार यांनी दिलेला प्रत्येक लोकसभा क्षेत्रात सभा घेऊन जनजागृतीचा कार्यक्रम राबविण्यासाठी अविरत काम करण्याचे आवाहन रामभक्तांना केले. वर्षभरापूर्वी मीच धैर्य राखण्याचे आवाहन केले होते, परंतु आता नाही. प्रत्येकालाच राम मंदिर हवे आहे. प्रभू श्रीराम सर्वांना जोडणारे होते. त्यांचे मंदिर बनेल तर सर्व वाद समाप्त होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी कारसेवकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने जनक्षोभ उसळला होता. जनहिताचे काम रोखले तर त्यांचा परिणाम काय होते, हे त्यावेळी दिसून आले, असे नमुद करीत त्यांनी सरकारला इशाराही दिला. 

हुंकार सभेला सर्व आमदार, महापौर व विदर्भातील विविध जिल्ह्यातून आलेले हजारोंच्या संख्येने रामभक्त उपस्थित होते. 'जय श्रीराम'च्या नाऱ्याने संपूर्ण परिसर दुमदुमला. 

यावेळी प्रास्ताविक प्रा. संजय भेंडे यांनी तर संचालन सनतकुमार गुप्ता यांनी केले, आभार अजय निलदावार यांनी मानले.
 

संबंधित लेख