Nagpur mayor Nanda Jichkar says if she gets opportunity she will again take her son on foreign tour | Sarkarnama

संधी मिळाल्यास पुन्हा मुलाला परदेशात नेणार: महापौर नंदा जिचकार 

सुरेश भुसारी 
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

 कॅलिफोर्नियात आयोजित  बैठकीत महापौरांनी मुलाला खासगी सचिव म्हणून नेल्याने वाद झाला होता.

नागपूर:  अमेरिका दौऱ्यावरून विरोधकांनी नागपूर महापालिकेच्या सभेत गोंधळ घातल्यानंतर कोणतीही नरमाईची किंवा नम्रता माफी मागितली नाही. याउलट पत्रकारांशी बोलताना संधी मिळाल्यास पुन्हा मुलाला परदेशात घेऊन जाईन, अशी भाषा नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी वापरली. 

अमेरिकेतील कॅलिफोर्नियात आयोजित या बैठकीत महापौरांनी मुलाला खासगी सचिव म्हणून नेल्याने वाद झाला होता. या प्रकारावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, नागपूर भाजपचे अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे, सत्तारुढ पक्षनेते संदीप जोशी यांनी नाराजी व्यक्त केली होती. अमेरिकेहून परत आल्यानंतर महापौर जिचकार यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेतल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी नरमाईची भूमिका स्वीकारून महापौर जिचकार यांना पाठिंबा देण्याचे ठरविले. 

नागपूर महापालिकेची सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीत कॉंग्रेससह विरोधकांनी महापौरांच्या अमेरिका दौऱ्यावरून गोंधळ घालण्यास सुरूवात केली. यावेळी महापौर नंदा जिचकार नम्रता स्वीकारून चुकीची कबुली देतील, अशी अपेक्षा होती. परंतु या चुकीची कबुली न देता याउलट आक्रमकपणा  दाखवून दिला.

पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुन्हा परदेशात जायची संधी मिळाल्यास मुलाला घेऊन जाईन, अशी वक्‍तव्य महापौर जिचकार यांनी काढले. या वक्तव्याचा विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी निषेध केला आहे. ही भाषा महापौरांना शोभत नसून "चोर तो चोर उलट शिरजोर' असा हा प्रकार आहे. सत्तेची गुर्मी माणसाला आंधळी करते, याचे हे उदाहरण असल्याचे वनवे यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले.  

संबंधित लेख