Nagpur mayor gets new car | Sarkarnama

महापौरांना मिळाली नवी कोरी गाडी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

नागपूरच्या महापौर नंदा जिचकार पाठदुखीने बेजार झाल्या होत्या. या पाठदुखीवर इलाज करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलणे आवश्‍यक होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने लगेच कार्यवाही करीत साडेचौदा लाख रुपये किमतीची टोयोटा कोरेला गाडी खरेदी केली. 

नागपूर : नागपूरच्या महापौर नंदा जिचकार पाठदुखीने बेजार झाल्या होत्या. या पाठदुखीवर इलाज करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलणे आवश्‍यक होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने लगेच कार्यवाही करीत साडेचौदा लाख रुपये किमतीची टोयोटा कोरेला गाडी खरेदी केली. 

महापौरांची गाडी जुनी होंडा सिटी होती. या गाडीला तब्बल सात वर्षे झाली होती. या गाडीने महापौरांची पाठदुखी अधिकच वाढली होती. त्यामुळे पाठदुखी दूर करण्यासाठी नवी गाडी पाहिजे, असा तर्क महापौर नंदा जिचकार यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यापुढे मांडला. आयुक्तांनीही "काहीही हरकत नाही' असे म्हणून नोट पुटअप केली. 

नागपूरच्या प्रथम नागरिकाच्या आरोग्याचा प्रश्‍न असल्याने स्थायी समिती व वित्त अधिकाऱ्यांनी कोणतेही आक्षेप न घेता, या खर्चाला विनासायास मंजुरी प्रदान केली. लगेच टोयोटा कोरेला गाडी महापौरांच्या कार्यालयासमोर उभी राहिली. आता महापौरांना कोणतीही पाठदुखी राहणार नसल्याने जनतेच्या सेवेत त्या अधिक जोमाने करणार असल्याचे दृष्य नागपूरकरांना पाहायला मिळणार आहे. 

संबंधित लेख