nagpur-maratha-reservation-mudhojiraje | Sarkarnama

मूक मोर्चाची दखल न घेतल्याने आंदोलन हिंसक; नागपूरकर भोसले मुधोजी राजे यांची प्रतिक्रिया 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 जुलै 2018

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे जवळपास 50वर मूक मोर्चे निघाले; परंतु सरकारने गांभीर्याने दखल न घेतल्याने आजची स्थिती उद्भवली असल्याची प्रतिक्रिया नागपूरकर भोसले घराण्याचे वंशज व मराठा समाजाचे नेते मुधोजी राजे भोसले यांनी व्यक्त केली. 

नागपूर : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे जवळपास 50वर मूक मोर्चे निघाले; परंतु सरकारने गांभीर्याने दखल न घेतल्याने आजची स्थिती उद्भवली असल्याची प्रतिक्रिया नागपूरकर भोसले घराण्याचे वंशज व मराठा समाजाचे नेते मुधोजी राजे भोसले यांनी व्यक्त केली. 

मराठा आरक्षणावरून मराठवाड्यासह महाराष्ट्रात आंदोलन तीव्र झालेले असताना या आंदोलनाची विदर्भाला मात्र फारशी झळ बसलेली नाही. विदर्भातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. 

या आंदोलनाच्या संदर्भात "सरकारनामा'शी बोलताना मुधोजी राजे म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यात पन्नासपेक्षा अधिक मूक मोर्चे निघाले. या मोर्चांमध्ये लाखावर लोक सामील झाले होते. या मोर्चांना सरकारने गांभीर्याने घेतले नाही तर "गम्मत' समजल्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाला हिंसक वळण मिळालेले असताना विदर्भातील समाज बांधवांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. 

या आवाहनानुसार विदर्भात आंदोलनाला हिंसक वळण मिळालेले नाही. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे योग्य नाही. परंतु हा असंतोष किती दिवस दबून राहील, हे सांगता येत नाही. या असंतोषाला हिंसक वळण मिळू शकते, असा इशाराही मुधोजी राजे यांनी दिला. 

नागपूरसह अकोला, अमरावती व बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये मराठा नेतृत्वाचा प्रभाव आहे. मराठा आंदोलनात मात्र या नेतृत्वाने फारसा सहभाग घेतलेला दिसत नाही. मंगळवारला कॉंग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांनी या आंदोलनात भाग घेतला. परंतु युवकांची संख्या फारच थोडी असल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत या युवकांना ताब्यात घेतले. मराठा समाजातील प्रस्थापित नेतृत्व मात्र समोर आले नाही. 

संबंधित लेख