nagpur-laxman-mane-demands-action-against-culprits-who-burnt-constitution | Sarkarnama

संविधान जाळणाऱ्यांना संरक्षण कसे? : माजी आमदार लक्ष्मण माने

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली देशाची राज्यघटना जाळणाऱ्यांना केंद्र सरकार संरक्षण देत असून या आरोपींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी `उपरा'कार लक्ष्मण माने यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेत केली.

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली देशाची राज्यघटना जाळणाऱ्यांना केंद्र सरकार संरक्षण देत असून या आरोपींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी `उपरा'कार लक्ष्मण माने यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेत केली.

दलित, आदिवासी व वंचितांची आघाडी तयार करण्यासाठी भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर नागपुरात आले आहेत. त्यांच्यासोबत झालेल्या पत्रकार परिषदेत लक्ष्मण माने यांनी आज दिल्लीत घडलेल्या घटनेचा निषेध केला. 

श्री. माने म्हणाले, की दिल्लीत जंतरमंतरवर काही समाजकंटकांनी राज्यघटना जाळण्याची घडली आहे. या संदर्भात सोशल मिडीयावर वृत्त प्रसारित झाले आहे. ही घटना खरी असेल तर अत्यंत आक्षेपार्ह बाब आहे. ज्या राज्य घटनेच्या भरवशावर या देशाचा कारभार चालतो. ही राज्यघटना जाळण्याचा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे. या आरोपींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची गरज आहे.

दिल्लीचे पोलीस अत्यंत `कार्यक्षम' असून त्यांनी विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार व इतरांवर लगेच राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल केले होते. ही तत्परता आता दिल्ली पोलिसांनी दाखवावी, असेही त्यांनी सांगितले.
 

संबंधित लेख