nagpur-eastern-vidharbha-shivsena-meeting | Sarkarnama

पूर्व विदर्भात शिवसेनेचा उत्साहच अधिक; विश्‍वास कमी? 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

पूर्व विदर्भात शिवसेना 3 लोकसभा व 20 विधानसभा मतदारसंघात विजयी होईल, असा विश्‍वास नवनियुक्त संपर्क प्रमुख खासदार गजानन किर्तीकर यांनी व्यक्त केला. शिवसेनेची पूर्व विदर्भातील संघटनात्मक स्थिती पाहता यात उत्साह अधिक व विश्‍वास कमी असल्याचे दिसून येते.

नागपूर : पूर्व विदर्भात शिवसेना 3 लोकसभा व 20 विधानसभा मतदारसंघात विजयी होईल, असा विश्‍वास नवनियुक्त संपर्क प्रमुख खासदार गजानन किर्तीकर यांनी व्यक्त केला. शिवसेनेची पूर्व विदर्भातील संघटनात्मक स्थिती पाहता यात उत्साह अधिक व विश्‍वास कमी असल्याचे दिसून येते.

पूर्व विदर्भात 6 लोकसभा व 32 विधानसभा मतदारसंघ आहेत. यात शिवसेनेकडे सध्या एकच खासदार कृपाल तुमाने (रामटेक) व एकच आमदार बाळू धानोरकर (वरोरा जि. चंद्रपूर) आहे. ही संख्या वाढवून 3 खासदार व 20 आमदार निवडून आणण्याचे लक्ष्य किर्तीकर यांनी ठरविले आहे. 

पूर्व विदर्भातील शिवसेनेचे संघटन पाहता एवढे यश मिळविण्याची भाषा करणे यात उत्साहच अधिक असल्याचे दिसून येते. गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भातील सेनेच्या संघटनेकडे दुर्लक्ष झाल्याने 90 च्या दशकात शिवसेनेकडे आकृष्ट झालेले तरूण सेनेला कायम ठेवता आले नाही. 

गेल्या चार वर्षात पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख म्हणून चारजण बदलावे लागले. यातूनच पूर्व विदर्भातील पक्ष संघटनेकडे किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते. अनेक जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारिणीही जाहीर झालेली नाही. नागपूरसारख्या शहरात केवळ 2 नगरसेवकांवर सेनेला समाधान मानावे लागले.
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावाने अगदी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी या भागातही सेनेचा आमदार निवडून आला होता. आता या भागात सेनेच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होते. या भागातील संघटनेकडे पुरते दुर्लक्ष झाल्याने शिवसेनेची जागा भाजपने भरायला सुरूवात केली. 

पूर्व विदर्भात शिवसेनेमुळे भाजप वाढली, असे खासदार गजानन किर्तीकर यांनी सांगितले, हे बरेच झाले. ही वस्तुस्थिती आहे. शिवसेनेच्या संपर्कप्रमुखाला किमान याची जाणीव आहे, हेही नसे थोडके.
 

संबंधित लेख