nagpur-dhangar-reservation-vikas-mahatme | Sarkarnama

धनगर आरक्षणासाठी दिला डॉ. महात्मेंनी आंदोलनाचा इशारा 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 जुलै 2018

मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात आंदोलन सुरू असताना धनगर समाजाचे नेते व भाजपचे खासदार डॉ. विकास महात्मे यांनीही धनगर आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

नागपूर : मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात आंदोलन सुरू असताना धनगर समाजाचे नेते व भाजपचे खासदार डॉ. विकास महात्मे यांनीही धनगर आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

गेल्या आठवड्यापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन राज्यात सुरू आहे. या आंदोलनाबद्दल लोकसभेतही कॉंग्रेस व शिवसेनेच्या खासदारांनी मुद्दा उपस्थित करून केंद्र सरकारचे लक्ष वेधले. या मुद्यावर भाजपचे खासदारांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. राज्यसभेत भाजपचे खासदार डॉ. विकास महात्मे यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. राज्य सरकारने या संदर्भात त्वरित पावले उचलून धनगरांना आरक्षण देण्याचे आश्‍वासन पूर्ण करावे, अशी मागणी डॉ. महात्मे यांनी राज्यसभेत शून्य प्रहरात बोलताना केली.
 
डॉ. महात्मे गेल्या अनेक वर्षांपासून धनगर आरक्षणासाठी लढा देत आहेत. भाजपने धनगरांना आरक्षण देण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दोन वर्षांपूर्वी त्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली. यानंतरही धनगरांना आरक्षण मिळू शकले नाही. 

धनगर राज्यात एनटी या प्रवर्गात येत असून धनगरांना अनुसूचित जमातीमध्ये स्थान देण्यात यावे, अशी मागणी डॉ. महात्मे यांनी केली. ही मागणी पूर्ण न केल्याने समाजामध्ये नाराजी असल्याचे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. 

नागपुरातील एका कार्यक्रमातही त्यांनी धनगरांना आरक्षण न दिल्याबद्दल भाजपबद्दल धनगर समाजात नाराजी असल्याचे वक्तव्य दिले होते. धनगरांच्या मागणी पूर्ण न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ. महात्मे यांनी दिला.
 

संबंधित लेख