nagpur-dhangar-reservation-rasta-roko | Sarkarnama

धनगरांच्या आरक्षणासाठी मेंढ्या आणल्या रस्त्यावर 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

धनगरांना अनुसूचित जमातीसाठी समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी आज भाजपचे खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या नेतृत्वात नागपूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यावर मेंढ्या आणून आंदोलन केले. यामुळे काहीवेळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

नागपूर : धनगरांना अनुसूचित जमातीसाठी समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी आज भाजपचे खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या नेतृत्वात नागपूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यावर मेंढ्या आणून आंदोलन केले. यामुळे काहीवेळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
 
मराठा आरक्षणाच्या मागणीने महाराष्ट्र ढवळून निघालेला असताना आता धनगरांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन छेडले आहे. धनगर समाज संघर्ष समितीतर्फे या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व खासदार डॉ. विकास महात्मे यांनी केले. 

अचानकपणे रस्त्यांवर शेकडो मेंढ्या आल्याने रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. राष्ट्रीय महामार्गावरच हे आंदोलन झाल्याने पोलिसांनी खासदार विकास महात्मे यांना ताब्यात घेतले. 

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. महात्मे यांनी भाजप सरकारवर टीका केली. धनगर समाजाच्या पाठिंब्यामुळे भाजप सरकार सत्तेत आले आहे, याची आठवण देऊन डॉ. महात्मे म्हणाले, धनगर समाज जसा एखाद्या पक्षाला सत्तेत आणू शकतो, त्याचप्रमाणे त्या पक्षाला सत्तेतूनही घालवू शकतो. याची आठवण भाजपने ठेवावी. भाजप धनगरांची मागणी पूर्ण करेल, यासाठीच भाजपला साथ दिली होती. भाजपने अद्यापही ही मागणी पूर्ण न केल्याने धनगर समाजबांधवांमध्ये तीव्र नाराजी असल्याचा दावा खासदार डॉ. महात्मे यांनी केला.
 

संबंधित लेख