nagpur-congress-sevadal | Sarkarnama

नागपुरात स्थापन झालेल्या सेवादलाची कॉंग्रेसला झाली आठवण 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 30 जुलै 2018

नागपूरमध्ये स्थापन झालेल्या सेवादलाची काळाच्या ओघात विस्मरण झाले. परंतु आता उग्र राष्ट्रवादाचा सामना करण्यासाठी सेवादलाच्या संघटनेला मध्यवर्ती भूमिका देण्याचे कॉंग्रेसने ठरविले आहे. याचाच परिपाक म्हणून देशातील 705 गाव व शहरांमध्ये प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी "ध्वज वंदना' उपक्रम राबविला जाणार आहे. 

नागपूर : नागपूरमध्ये स्थापन झालेल्या सेवादलाची काळाच्या ओघात विस्मरण झाले. परंतु आता उग्र राष्ट्रवादाचा सामना करण्यासाठी सेवादलाच्या संघटनेला मध्यवर्ती भूमिका देण्याचे कॉंग्रेसने ठरविले आहे. याचाच परिपाक म्हणून देशातील 705 गाव व शहरांमध्ये प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी "ध्वज वंदना' उपक्रम राबविला जाणार आहे. 

1921 मध्ये नागपुरात झेंडा सत्याग्रह झाला होता. इंग्रज सरकारच्या विरोधात झालेले नागपुरातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे हे अनोखे आंदोलन पाहण्यासाठी खुद्द जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल नागपुरात आले होते. या आंदोलनात बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे वंदेमातरम गीत व नागपुरातील श्‍यामलाल गुप्त पार्षद या क्रांतीकारकाचे " विजयी विश्‍व तिरंगा प्यारा, झेंडा उंचा रहे हमारा' हे ध्वजगीत म्हणून मान्यता देण्यात आली. या आंदोलनातूनच नागपुरात कॉंग्रेस सेवादलाची स्थापना झाली. 

ज्येष्ठ गांधीवादी डॉ. ना. सु. हर्डीकर यांनी या संघटेनेची स्थापना केली. त्यांनी प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी ध्वज वंदना करण्याचे मान्य करण्यात आले होते. तेव्हापासून कॉंग्रेसमध्ये प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी "ध्वज वंदना' केली जात होती. 

काळाच्या ओघात सेवादलाच्या संघटनेकडे कॉंग्रेस पक्षाचे दुर्लक्ष झाले. केवळ मोठ्या कार्यक्रमात सलामी देण्यापुरते सेवादलाचे अस्तित्व कॉंग्रेसमध्ये शिल्लक राहिले. राहुल गांधी यांनी कॉंग्रेस पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लालजी देसाई यांची सेवादलाचे राष्ट्रीय मुख्य संघटक म्हणून नियुक्ती केली. सेवादलाचे संघटन मजबूत करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार आहे. 

संघ परिवाराच्या संघटनांकडून उग्रराष्ट्रवादाचा सामना करण्यासाठी आता सेवादलाचे नव्याने पुनर्गठन करण्याचे कॉंग्रेसने ठरविले आहे. यासाठी लालजी देसाई यांनी प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी ध्वज वंदना करण्याचे निर्देश सेवादलाच्या संघटकांना दिले आहे. यापुढे प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी देशातील 705 शहरांमध्ये "ध्वज वंदना' उपक्रम राबविला जाणार असल्याचे लालजी देसाई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख