Nagpur congress politics | Sarkarnama

कॉंग्रेसच्या नागपूर शहराध्यक्षांकडून गटबाजांची मनधरणी सुरू 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 मे 2017

लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकांमध्ये पराभवाची हॅट्ट्रिक साधल्यानंतर कॉंग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा कामाला लागले आहेत. कॉंग्रेस शहराध्यक्षांना कॉंग्रेसमधीलच गटबाजांची मनधरणी करावा लागणार आहे. 

नागपूर : लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकांमध्ये पराभवाची हॅट्ट्रिक साधल्यानंतर कॉंग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा कामाला लागले आहेत. कॉंग्रेस शहराध्यक्षांना कॉंग्रेसमधीलच गटबाजांची मनधरणी करावा लागणार आहे. 

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा तब्बल वीस वर्षांनी नागपुरात पराभव झाला. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला शहरातून एकही आमदार निवडून आणता आला नाही. शहरातील सहाही मतदारसंघात कॉंग्रेसचा पराभव झाला. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीतही कॉंग्रेसला सपाटून मार खावा लागला. कॉंग्रेसला केवळ 29 जागांवरच समाधान मानावे लागले. 

ही पराभवाची हॅटट्रिक साधल्यानंतर पुन्हा नागपूर शहर कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावून 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तब्बल 3 लाखावर मतांनी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचा पराभव केला होता. 

शहरात सातत्याने पराभवाला सामोरे जावे लागत असतानाही कॉंग्रेसमधील गटबाजी संपण्याची चिन्हे नाहीत. गटबाजीचा सामना येथील कॉंग्रेसजनांना करावा लागत आहे. या बैठकीला माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व नितीन राऊत यांच्या समर्थकांनी हजेरी लावली नाही. मतदारांचा कौल मागण्यापूर्वी कॉंग्रेसच्या नेत्यांना आपल्याच नेत्यांची मनधरणी करावी लागणार आहे. 
 

संबंधित लेख