NAGPUR-CONGRESS-MEETING-SEVAGRAM | Sarkarnama

कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीच्या जागेचा वाद मिटला

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

कॉंग्रेसच्या कार्यकारिणीची (सीडब्ल्यूसी) बैठकीच्या जागेचा वाद आता संपुष्टात आला असून येत्या 2 ऑक्‍टोबरला दुपारी 12 वाजता ही बैठक आश्रम परिसरातील महादेव भवनात होणार आहे. या बैठकीनंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून 2 किलोमीटर पदयात्रा काढली जाणार असून या पदयात्रेचे नेतृत्व कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी करणार आहेत. 

नागपूर : कॉंग्रेसच्या कार्यकारिणीची (सीडब्ल्यूसी) बैठकीच्या जागेचा वाद आता संपुष्टात आला असून येत्या 2 ऑक्‍टोबरला दुपारी 12 वाजता ही बैठक आश्रम परिसरातील महादेव भवनात होणार आहे. या बैठकीनंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून 2 किलोमीटर पदयात्रा काढली जाणार असून या पदयात्रेचे नेतृत्व कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी करणार आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीवरून वाद निर्माण झाला होता. हा वाद आता जवळपास संपुष्टात आला आहे. सर्व सेवा संघाच्या ताब्यात असलेल्या महादेव भवनात कार्यकारिणीची बैठक होणार आहे. याशिवाय वेळेवर काही अडचण आल्यास यात्री निवासचाही पर्याय ठेवल्याचे कॉंग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. 

सकाळी साडेदहा वाजता माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी व कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी विशेष विमानाने नागपुरात येणार आहेत. येथून हेलिकॉप्टरने ते वर्धा येथे पोहोचणार आहेत. 

सीडब्ल्यूसीची बैठक दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत होणार आहे. ही बैठक संपल्यानंतर सेवाग्राममधील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून पदयात्रा काढली जाणार आहे. ही पदयात्रा रामनगर मैदानापर्यंत जाईल. या पदयात्रेत डॉ. मनमोहन सिंग व सोनिया गांधी सहभागी होणार नसल्याचे समजते. हे अंतर 2 किलोमीटर एवढे आहे. या मैदानावरच राहुल गांधी यांची जाहीरसभा होणार आहे. या जाहीर सभेनंतर सायंकाळी 5 वाजता तिन्ही नेते हेलिकॉप्टरनेच नागपूरला परतणार आहेत. 

जागेबद्दल वाद नव्हता- मुत्तेमवार 
या जागेच्या संदर्भात "सरकारनामा'शी बोलताना माजी केंद्रीय मंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार म्हणाले, जागेबद्दल कोणताही वाद नव्हता. सर्व सेवा संघाचे काही पदाधिकारी वर्धा येथे नव्हते. यामुळे निर्णय होऊ शकला नव्हता. 2 ऑक्‍टोबरला सेवाग्राममध्ये इतर लोकही मोठ्या प्रमाणावर येत असल्याने सुरक्षेचा काही प्रश्‍न होऊ नये, यादृष्टीने कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे. सेवाग्रामला सीडब्ल्यूसीची बैठक घेण्यात राहुल गांधी यांची दूरदृष्टी असून देशात एक सकारात्मक संदेश जाईल, असेही मुत्तेमवार यांनी सांगितले. 

राहुल गांधी यांचा सेवाग्रामचा 2 ऑक्‍टोबर 2018 चा संभाव्य कार्यक्रम 

  • सकाळी 10.30 वाजता- नागपूरला आगमन 
  • सकाळी 10.45 वाजता- हेलिकॉप्टरने वर्धेला रवाना 
  • सकाळी 11.15 वाजता- सेवाग्रामला आगमन 
  • सकाळी 11.30 वाजता- बापूकुटीला भेट व कार्यक्रमात सहभाग 
  • दुपारी 12 वाजता- कॉंग्रेसची सीडब्ल्यूसी बैठक 
  • दुपारी 2 वाजता- राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पदयात्रा 
  • दुपारी 4 वाजता- रामनगर मैदानावर जाहीर सभा 
  • सायंकाळी 5 वाजता- हेलिकॉप्टरने नागपूरकडे प्रयाण

संबंधित लेख