Nagpur Congress Faction Trying to Corner State President Ashok Chavan | Sarkarnama

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना घेरण्यासाठी 'नाना' तऱ्हा

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीत निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मधुकर कुकडे यांच्या सत्काराच्या निमित्ताने हा मेळावा नागपुरात होत आहे. यामागे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी पुढाकार घेतला आहे. गोंदिया-भंडारा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मधुकर कुकडे यांच्या सत्कार नागपुरात करण्यामागे राजकीय हेतू आहे.

नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना घेरण्यासाठी काँग्रेसमधील विदर्भातील गट पुन्हा एकदा सक्रिय झाला असून यासाठी 'असंतुष्टां'चा मेळावा येत्या 1 सप्टेंबरला बहुजन विचारमंचच्या नावाने आयोजित केला आहे. 

भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीत निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मधुकर कुकडे यांच्या सत्काराच्या निमित्ताने हा मेळावा नागपुरात होत आहे. यामागे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी पुढाकार घेतला आहे. गोंदिया-भंडारा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मधुकर कुकडे यांच्या सत्कार नागपुरात करण्यामागे राजकीय हेतू आहे. या सत्कार समारंभासाठी नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांना बाजूला ठेवण्यात आले आहे. हे दोन्ही नेते प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या विश्‍वासातील मानले जातात.

प्रदेशाध्यक्ष पदावरून खासदार अशोक चव्हाण यांना हटविण्यासाठी सक्रिय राहिलेले सर्वजण मात्र या सत्कार समारंभाला हजेरी लावणार आहेत. यात माजी मंत्री नितीन राऊत, माजी मंत्री वसंत पुरके, माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचा समावेश आहे. निमित्त खासदार मधुकर कुकडे यांच्या सत्काराचे असले तरी यातून चव्हाण यांना शह देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. माजी खासदार नाना पटोले यांची कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा लपून राहिलेली नाही.

नागपुरात मेळावा घेण्यामागे लोकसभेसाठी आपली उमेदवारी भक्कम करण्याचा प्रयत्न नाना पटोले करणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात आपण निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे नाना पटोले यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. यासाठी मुत्तेमवार यांच्या विरोधात पक्षात दबावगट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित लेख