Nagpur congress crisis | Sarkarnama

कॉंग्रेसमध्ये चिखलफेक सुरूच 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

नागपूर महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसचे पानिपत झाले तरी शहरातील कॉंग्रेस नेत्यांची एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप बंद झालेले नाहीत. 

नागपूर : नागपूर महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसचे पानिपत झाले तरी शहरातील कॉंग्रेस नेत्यांची एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप बंद झालेले नाहीत. 

महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसला केवळ 29 जागा जिंकता आल्या आहेत. निवडणुकीपूर्वीपासून कॉंग्रेसमधील मतभेद उघड झाले. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार व नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या विरोधात माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व नितीन राऊत यांनी आघाडी उघडली होती. चतुर्वेदी व राऊत यांनी कॉंग्रेसच्या कार्यक्रमावरच बहिष्कार टाकला होता. कॉंग्रेसच्या स्थापन दिनाच्या कार्यक्रमालाही ते हजर राहिले नव्हते. महापालिका निवडणुकीत चतुर्वेदी व राऊत यांनी अपक्ष नगरसेवकांचा प्रचार करून कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात प्रचार केला. त्याचे छायाचित्रेही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले. 

या मतभेदांचा परिणाम निकालात दिसून आला. या निकालानंतरही कॉंग्रेस नेत्यांमधील मतभेद मिटले नाही. नितीन राऊत व चतुर्वेदी यांनी थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याच विरोधात श्रेष्ठींकडे तक्रार केली व त्यांना हटविण्याची मागणी केली. 
नागपूर शहर कॉंग्रेस समिती मात्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व नागपूर शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यामागे उभी राहिली आहे. समितीच्या बैठकीत चव्हाण व ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास दर्शविणारा ठराव संमत केला. या समितीच्या बैठकीवरही चतुर्वेदी-राऊत गटाने बहिष्कार टाकला होता. 

एवढेच नव्हे तर शहर कॉंग्रेसने शहरातील कॉंग्रेस नेत्यांच्या पक्षविरोधी कारवाईची चौकशी करण्यासाठी समिती पाठविण्याची मागणी प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे. यामुळे आता मुत्तेमवार-ठाकरे व चतुर्वेदी-राऊत गट आता आरपारची लढाई लढण्यासाठी एकमेकांच्या समोर उभे ठाकल्याचे स्पष्ट झाले आहे. 
 

संबंधित लेख