nagpur congress and some problem | Sarkarnama

नागपूर कॉंग्रेसमध्ये पुन्हा भांडणे, शहराध्यक्षांच्याच विरोधात पोलिसात तक्रार

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

नागपूर : " भारत बंद ' च्या निमित्ताने नागपुरातील सारे कॉंग्रेसजन एकत्र आल्याचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. या रॅलीत नागपूर शहर कॉंग्रेस अध्यक्षांनीच धक्काबुक्की केल्याचा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेत्याने केला आहे. हा वाद आता पोलिस ठाण्यात पोहोचला आहे. यावरून कॉंग्रेसमधील झोंबाझोंबी निकालात निघालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

गेल्या चार वर्षांपासून शहर कॉंग्रेसमध्ये वादावादी सुरू आहे. हा वाद इतका विकोपाला गेला की, कॉंग्रेसच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमालाही असंतुष्ट गट हजर राहिला नाही. यावरून अनेक नेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या होत्या. अखेर हा वाद दिल्लीपर्यंत पोहोचला असंतुष्टांचे म्होरके व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांची कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. 

"भारत बंद' आंदोलनात सहभागी होण्यासाठी अ. भा. कॉंग्रेस समितीचे सचिव आशीष दुआ नागपुरात दाखल झाल्याने असंतुष्टांना नाईलाजाने भारत बंद आंदोलनात सहभागी व्हावे लागले. मात्र भारत बंदमुळे कॉंग्रेस नेते एकत्र आल्याचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. भारत बंद आंदोलनात नागपूर शहर कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी धक्काबुक्की करून हाकलून लावल्याचा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी केला आहे. 

यासंदर्भात त्यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विकास ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही कॉंग्रेसमधील भांडणे मात्र थांबलेली नसल्याचे या वादाने स्पष्ट झाले आहे. 

संबंधित लेख