nagpur-cm-fadanvis-bhim-army | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

मुख्यमंत्र्यांना नागपुरात `भीम आर्मी'ने दाखविले काळे झेंडे 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

नागपुरातील दीक्षाभूमीवर झालेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला जाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून "मुर्दाबाद'चे नारे दिले. या प्रकरणी पोलिसांनी चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

नागपूर : नागपुरातील दीक्षाभूमीवर झालेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला जाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून "मुर्दाबाद'चे नारे दिले. या प्रकरणी पोलिसांनी चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

गुरुवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दीक्षाभूमीवर आयोजित कार्यक्रमासाठी जात होते. मुख्यमंत्र्यांचा ताफा आत जात असताना काही युवकांनी अचानकपणे काळे झेंडे दाखवून `मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद' असे नारे देण्यास सुरूवात केली. अचानकपणे सुरू झालेल्या प्रकाराने पोलिसांनाही धक्का बसला. पोलिसांनी तत्काळ या युवकांना ताब्यात घेतले. हे युवक भीम आर्मी सेनेचे सदस्य असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

कोरेगाव भीमा येथील दंगलीसाठी जबाबदार आरोपींना राज्य सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. यामुळे धम्मचक्रप्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यासपीठावर जाऊ नये, अशी मागणी केली. याउपरही मुख्यमंत्र्यांना याकार्यक्रमाला निमंत्रित केल्यास मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवू, असा इशारा पत्रकार परिषदेत दिला होता. हा इशारा भीम आर्मी सेनेच्या कार्यकर्त्यांनी खरा करून दाखविला. 

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविल्यानंतर व मुर्दाबादचे नारे दिल्यानंतर पोलिसांनी अमोलकुमार चिमणकर, संघरत्न पाटील, प्रशांत बनसोड, अजय भिमटे (सर्व रा. नागपूर) यांना ताब्यात घेतले आहे. हे चौघेही भीम आर्मी सेनेचे कार्यकर्ते असल्याचे पोलिसांनी सांगितले. या चौघांवरही मुंबई पोलिस कायद्याच्या कलम 37 (1) चे उल्लंघन केल्याचा आरोप लावला आहे. या प्रकरणी बजाजनगर पोलिस ठाण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित लेख