nagpur-chandrashekhar-bavankule-ganpati-festival | Sarkarnama

गणेश मंडळांना आता सरकारचीही आरती ओवाळावी लागणार

राजेश प्रायकर
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

राज्य सरकारच्या योजनांचा प्रसार व प्रचार गणेश मंडळांनी करावा, असे फर्मान नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले आहे. यामुळे आता गणेश मंडळांवर आता सरकारचीही आरती ओवाळण्याची वेळ आली आहे.

नागपूर : राज्य सरकारच्या योजनांचा प्रसार व प्रचार गणेश मंडळांनी करावा, असे फर्मान नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले आहे. यामुळे आता गणेश मंडळांवर सरकारचीही आरती ओवाळण्याची वेळ आली आहे.

पुढील महिन्यात गणेशोत्सवाची धामधुम सुरू होणार आहे. येत्या 13 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, आमदार सुधाकर देशमुख, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार आशीष देशमुख, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, मनपा आयुक्त वीरेंद्र सिंग, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप यादव, पोलिस अधीक्षक (नागपूर ग्रामीण) राकेश ओला उपस्थित होते.

समाजातील सर्वच घटकांसाठी शासनातर्फे लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. त्याची माहिती आणि उद्देश गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहचविण्याचे कार्य गणेश मंडळांनी करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले. 

राज्य सरकारच्या योजनांची माहिती देणारे देखावे गणेश मंडळामध्ये प्रामुख्याने तयार करावे. तसेच टीव्हीवर सुद्धा राज्य सरकारच्या योजनांची देण्यात यावे, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. यामुळे आता देखावे कोणते करायचे व सरकारच्या योजनांची माहिती कुणाकडून घ्यावयाची, यावर आता गणेश मंडळांच्या आयोजकांची "माथापच्ची' सुरू झाली आहे. 

सार्वजनिक उत्सव शांततेत पार पाडण्याची नागपूरची परंपरा आहे. भोसले काळापासून उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक विषयांची जनजागृती करण्याचे कार्य नागपूरकर करीत असतात. समाजातील सर्वच घटक या उत्सवात सहभागी होत असतात. जनजागृतीचे कार्य गणेश मंडळांनी पुढे न्यावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख