nagpur-chandrashekhar-bavankule-devendra-godbole | Sarkarnama

चंद्रशेखर बावनकुळेंच्या दबावामुळे तडीपारची नोटीस; नागपूर जिल्ह्यातील शिवसेना नेत्याचा आरोप 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर तडीपारची नोटीस बजावण्यासाठी भाजपचे नेते व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप नागपूर जिल्हा शिवसेना उपप्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी केला आहे.

नागपूर : ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर तडीपारची नोटीस बजावण्यासाठी भाजपचे नेते व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप नागपूर जिल्हा शिवसेना उपप्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी केला आहे.
 
नागपूर जिल्ह्यात 383 ग्रामपंचायतमध्ये निवडणुकांसाठी बुधवारी मतदान होत आहे. पालकमंत्री बावनकुळे यांच्या कामठी मतदारसंघात मौदा तालुक्‍याचा काही भाग येतो. या तालुक्‍यातील मौदा बाबदेव या भागात शिवसेनेचे देवेंद्र गोडबोले यांचाही चांगला प्रभाव आहे. त्यांच्या पत्नी भारती गोडबोले या बाबदेव मौदा या सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्या आहेत. 

ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर मौदा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर चार दिवसांपूर्वी आपणास तडीपार कां करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली. या नोटीसला देवेंद्र गोडबोले यांनी उत्तर दिले आहे. 

तडीपार करण्यासाठी गुन्हेगारावर पोलिसांकडे गंभीर गुन्हा दाखल होण्याची गरज आहे. पोलिसांनी दिलेल्या नोटीसमध्ये दिलेले गुन्हे राजकीय स्वरुपाचे आहेत. विद्यार्थ्यांना बस मिळावी, यासाठी देवेंद्र गोडबोले यांनी कुंभारी गावाजवळ आंदोलन केले होते. तसेच माथनी टोलनाक्‍यावरील कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे, यासाठी आमदार बच्चू कडू यांच्यासोबत आंदोलन केले होते. या दोन गुन्ह्यांच्या भरवशावर गोडबोले यांच्यावर तडीपारची नोटीस बजावली आहे. कोणताही गंभीर गुन्हे नसताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दबावामुळे पोलिसांनी ही नोटीस बजावली असल्याचा आरोप देवेंद्र गोडबोले यांनी केला आहे. 

ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही नोटीस बजावण्यामुळे बावनकुळे यांना मौदा तालुक्‍यातील ग्रामपंचायतमध्ये पराभव दिसू लागल्याचा आरोप गोडबोले यांनी "सरकारनामा'शी बोलताना केला.
 

संबंधित लेख