nagpur-CEC-Rawat-EVM-Machine | Sarkarnama

ईव्हीएमपासून माघार नाही : मुख्य निवडणूक आयुक्त रावत

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

मतदान प्रक्रियेसाठी ईव्हीएमचा पर्यायापासून माघार घेण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी आज नागपुरात केले. 

नागपूर : मतदान प्रक्रियेसाठी ईव्हीएमचा पर्यायापासून माघार घेण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी आज नागपुरात केले. 

राष्ट्रभाषा सभेने प्रख्यात पत्रकार राजेंद्र माथूर यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित केलेल्या निवडणूक प्रक्रियेवरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी त्यांनी ईव्हीएम मशीनबाबत विविध युक्तीवाद करून ईव्हीएम मशीन मतदानासाठी योग्य असल्याचे सांगितले.

ईव्हीएममशीनमध्ये सातत्याने बदलव अचूकता आणण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. मतदान पत्रिकेने होत असलेल्या मतदानामध्ये अनेक ठिकाणी बुथ कॅप्चरिंग व विविध गैरप्रकार घडत असल्याचा अनुभव आपल्या पाठीशी आहे. यातून सुटका करण्यासाठी 1977 पासून ईलेक्‍ट्रॉनिक मशीन आणण्याचे प्रयत्न सुरू होते. ईव्हीएमचा पहिल्यांदा 1982 मध्ये प्रयोग झाला होता. परंतु तेव्हा लोकप्रतिनिधी कायद्यात दुरुस्ती न झाल्याने न्यायालयाने ईव्हीएमवर बंदी आणली होती, असा दाखलाही त्यांनी दिला. 

गेल्या काही दिवसांपासून ईव्हीएम मशीनबद्दल विविध राजकीय पक्षांकडून संशय व्यक्त केला जात आहे. या संशयांचे व प्रश्‍नांचे निवडणूक आयोग म्हणून नेहमीच स्वागत करीत आहे. त्यांच्या संशयाचे निरसन करण्याचा प्रयत्न निश्‍चित केला जाईल. परंतु आता काळाच्या उलटे काटे फिरविण्याची शक्‍यता नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या ईव्हीएममध्ये कोणताही बदल किंवा टॅम्परिंग होण्याची शक्‍यता नाही. यासाठी हैदराबादच्या इंडीयन फॉरेन्सिक इन्स्टिट्यूटने अहवाल दिला आहे. याउपरही काही राजकीय पक्षांमध्ये संशय असल्याच्या त्यांचे मत ऐकून घेतले जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मतदारांच्या विविध प्रश्‍नांना उत्तरे दिली.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख