nagpur-CEC-Rawat-EVM-Machine | Sarkarnama

`वन नेशन, वन इलेक्‍शन' अशक्‍य : मुख्य निवडणूक आयुक्त रावत

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

सर्व राज्यांच्या विधानसभा व लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका एकाच वेळी घेण्याची कोणतीही शक्‍यता नसल्याचा निर्वाळा मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. 

नागपूर : सर्व राज्यांच्या विधानसभा व लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका एकाच वेळी घेण्याची कोणतीही शक्‍यता नसल्याचा निर्वाळा मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. 

एका व्याख्यानमालेसाठी ओ. पी. रावत नागपुरात आले होते. यानंतर निवडक पत्रकारांशी बोलताना रावत यांनी विविध प्रश्‍नांना उत्तर दिली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी `वन नेशन, वन इलेक्‍शन' ही संकल्पना मांडली आहे. यावर बोलताना रावत म्हणाले, देशात मोठ्या प्रमाणावर ईव्हीएम मशीन उपलब्ध करणे कठीण आहे. सध्या निवडणूक आयोगाकडे 23 लाख ईव्हीएम मशीन आहे. देशात एकाचवेळी सर्व राज्यांच्या विधानसभा व लोकसभा निवडणूक घ्यावयाची असल्यास निवडणूक आयोगाला 45 लाख ईव्हीएमची आवश्‍यकता भासणार आहे. एवढ्या प्रमाणावर ईव्हीएम केवळ एक वर्षाच्या आत उपलब्ध करून घेणे शक्‍य नाही. त्यामुळे एकाचवेळी सर्व राज्यांच्या विधानसभा व लोकसभा निवडणुका घेणे शक्‍य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष करण्यासाठी निवडणूक आयोगाची नेहमीच तयारी आहे. निवडणूक प्रक्रिया ही नेहमीच सुरक्षित हातात राहिली आहे. यासाठी व्हीव्हीपॅट सुविधा आणली आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत सर्व ईव्हीएम मशीनला व्हीव्हीपॅट लावण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सोशल मिडीयावरून होणाऱ्या अपप्रचाराला आळा घालण्यासाठी सोशल मिडीयाच्या फेसबुक, ट्विटरच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या किंवा मतदारांना आमीष दाखविणाऱ्या पोस्टवर नियंत्रण आणण्यासाठी या सोशल मिडीयावर प्रभाव असणाऱ्या कंपन्यांनीही तयारी दाखविल्याचे त्यांनी सांगितले. 

ऑनलाईन मतदान शक्‍य? 
ऑनलाईन मतदानाची शक्‍यता आहे काय? यावर बोलताना ते म्हणाले, तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात काय वाईट आहे. पोस्टल मतदान करण्यासाठी आम्ही ऑनलाईन मतदानाची प्रायोगिक तत्वावर चाचणी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. सैनिक, पोलीस किंवा परदेशात राहणाऱ्यांना ऑनलाईन मतदान करता येईल, यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

एनआरसीचा मतदारावर परिणाम नाही 
आसाममध्ये सध्या सुरू असलेल्या एनआरसीच्या वादावर बोलताना ते म्हणाले, सध्या एनआरसीचा फक्त मसुदा जाहीर झाला आहे. याबद्दलची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. ज्यांची नावे एनआरसीमध्ये नाहीत. त्यांना भारताचा नागरिक असल्याचे सिद्ध करण्याची पूर्ण संधी देण्यात येईल. त्यांनी पुरावे दिल्यास त्यांना मतदानापासून वंचित ठेवता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख