Nagpur BSP politics | Sarkarnama

नागपूर बसपात "राडा' 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 27 मार्च 2017

नागपूर महापालिका निवडणुकीपासून बहुजन समाज पार्टीत सुरू झालेला संघर्ष आता "हातघाई'वर आला आहे. बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांच्या विरोधाने आता नागपुरात उग्ररूप धारण केले आहे. 

नागपूर : नागपूर महापालिका निवडणुकीपासून बहुजन समाज पार्टीत सुरू झालेला संघर्ष आता "हातघाई'वर आला आहे. बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांच्या विरोधाने आता नागपुरात उग्ररूप धारण केले आहे. 

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्यापासून या संघर्षाला सुरवात झाली. उमेदवारी पैसे घेऊन विकल्याचा आरोप करण्यात आला. उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी नागपुरात आलेल्या गरुड यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर गरुड यांनी मुंबईला गेल्यानंतर त्यांची पुन्हा नागपुरात भरारी मारली नाही. नागपुरात बसपाचे 10 नगरसेवक निवडून आलेले आहेत. महापालिकेत बसपा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. यानंतरही गरुड यांनी नागपूरला येणे टाळले. गरुड विरोधकांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. कार्यालयीन सचिव सागर डबरासे व मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांना बसपातून निलंबित केले आहे. 

गरुड विरोधकांना एकत्रित करण्यासाठी आमदार निवास रविवारी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यात उमेदवारी नाकारलेले, पराभूत उमेदवारी उपस्थित होते. या बैठकीत गरुड यांचे समर्थक नागोराव जयकर काही समर्थकांसह पोचले. त्यांनी कार्यक्रमात अडथळे आणण्यास सुरवात केली. 

पक्षातून निलंबित झालेल्यांनी पक्षाच्या चिन्हाचा तसेच कांशीराम व पक्षाध्यक्ष मायावती यांच्या छायाचित्रांचा उपयोग करू नये, असा युक्तिवाद केला. नागोराव जयकर यांना डबरासे व शेवडे यांच्यासह अनेकांनी विरोध केला. यावरून वादावादी सुरू झाली. वादावादीचे रूपांतर पुढे हातघाईवर गेले. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. यामुळे अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी या दोन्ही गटाच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने तणाव निवळला. 

टॅग्स

संबंधित लेख