nagpur-balu-dhanorkar-sanjay-rathod-and-milind-narvekar-gajanan-kirtikar | Sarkarnama

आमदार धानोरकरांचा राज्यमंत्री राठोड यांच्यावर हल्लाबोल 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

पूर्व विदर्भाचे शिवसेनेचे नवनियुक्त संपर्कप्रमुख खासदार गजानन किर्तीकर यांच्या समक्ष असंतोषाला वाचा फोडून आमदार बाळू धानोरकर यांनी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

नागपूर : पूर्व विदर्भाचे शिवसेनेचे नवनियुक्त संपर्कप्रमुख खासदार गजानन किर्तीकर यांच्या समक्ष असंतोषाला वाचा फोडून आमदार बाळू धानोरकर यांनी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
 
पूर्व विदर्भाचे संपर्कप्रमुख खासदार किर्तीकर यांनी गुरुवारी नागपुरात पूर्व विदर्भातील प्रमुख पदाधिकारी, जिल्हा प्रमुख व जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक घेतली होती. या बैठक विदर्भातील सेना नेत्यांच्या दुहीचे चित्र बाहेर आले. भद्रावती नगर परिषदेच्या निवडणुकीत आमदार धानोरकर यांनी एकहाती विजय मिळविला. या निवडणुकीत शिवसेनेच्या एकाही मंत्र्याने भद्रावती येथे प्रचार केला नाही. विदर्भातील सेनेचे एकमेव मंत्री संजय राठोड यांनीही भद्रावतीला जाणे टाळले. हा संदर्भ देत आमदार धानोरकर यांनी सेना मंत्र्यांना धारेवर धरले. भाजपचे सर्व मंत्री फिरत असताना सेनेचे मंत्री मात्र विदर्भात येत नसल्याची खंत आमदार धानोरकर यांनी व्यक्त केली. त्यांचा रोख राज्यमंत्री संजय राठोड यांच्यावर होता. 

गेल्या काही महिन्यांपासून राज्यमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात सेना नेत्यांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. खासदार भावना गवळी (यवतमाळ) यांनीही संजय राठोड यांच्या विरोधात मातोश्रीवर तक्रार केली होती. आता आमदार धानोरकर यांनी खासदार गजानन किर्तीकर यांच्यासमोरच राठोड यांच्यावर हल्लाबोल केला. या हल्लाबोलनंतर लगेच मिलिंद नार्वेकर यांचा आमदार धानोरकर यांना दूरध्वनी गेल्याचे समजते. यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळण्याची शक्‍यता आहे. संजय राठोड यांच्याबद्दल यवतमाळ जिल्ह्यात अनेक तक्रारी असल्याचे समजते.
 

संबंधित लेख