nagpur-ashish-deshmukh-devendra-fadanvis-nitin-gadkari | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

अंबानींना नागपुरात जमिनी देण्यात फडणवीस व गडकरींचा पुढाकार : आशिष देशमुख

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

राफेल विमान खरेदीतील कथित गैरव्यवहातील अनिल अंबानी व फ्रांसच्या दसॉल्ट कंपनीला नागपुरातील मिहानमध्ये जमीन देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला होता, असा आरोप माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी केला आहे.

नागपूर : राफेल विमान खरेदीतील कथित गैरव्यवहातील अनिल अंबानी व फ्रांसच्या दसॉल्ट कंपनीला नागपुरातील मिहानमध्ये जमीन देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला होता, असा आरोप माजी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी केला आहे.

दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर राफेलवरून तोफ डागली. सध्या देशभर गाजत असलेल्या राफेल विमान खरेदीचे तार नागपूरशी जुळलेले आहेत. अनिल अंबानी यांची कंपनी व फ्रांसची कंपनी दसॉल्ट संयुक्त उपक्रमात राफेल विमानासाठी आवश्‍यक सुटे भाग तयार करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने नागपुरातील मिहानमध्ये या संयुक्त उपक्रमाला जागा उपलब्ध करून दिली आहे. 

या संदर्भात आशिष देशमुख यांनी म्हटले आहे की, दिल्ली येथे फ्रेंच राजदुतांशी चर्चा करून नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी राफेलसाठी नागपूर जागा देण्याचे निश्‍चित केले होते. केंद्रातील व राज्य सरकारच्या संगनमताने राफेलचा एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. 

भाजपमधील काहीजण कॉंग्रेसच्या वाटेवर
भाजपमध्ये अनेकजण नाराज असून येत्या काही दिवसात काही जण राजीनामा देतील, असा दावा डॉ. आशिष देशमुख यांनी केला आहे. भाजपच्या चुकीच्या नीतीमुळे माझ्यासारखे बरेच जण लोकप्रतिनिधी येणाऱ्या काळात कॉंग्रेसच्या वाटेवर चालणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

गेल्या चार वर्षात राज्य सरकारने सामान्य जनतेसाठी कोणतेही काम न केल्याने पुढील निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांची गच्छंती निश्‍चित असल्याचा दावा देशमुख यांनी केला. राज्य सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून यामुळे शेतकरी, युवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. दलित व अल्पसंख्यांकांच्या मनात या सरकारच्या विरोधात चीड आहे, हा असंतोष पुढील निवडणुकीत दिसून येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
 

संबंधित लेख