nagpur-AAP-mp-sanjay-singh-criticises-RSS | Sarkarnama

`संघा'चा राष्ट्रवाद समाजविघातक; `आप'चे खासदार संजय सिंग यांचा आरोप 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राष्ट्रवाद देशातील सर्व समाजाला जोडण्याऐवजी तोडण्याचे काम करीत असल्याने हा तथाकथित राष्ट्रवाद समाजविघातक असल्याचा आरोप आम आदमी पार्टी (आप)चे नेते व खासदार संजय सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना केला. 

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राष्ट्रवाद देशातील सर्व समाजाला जोडण्याऐवजी तोडण्याचे काम करीत असल्याने हा तथाकथित राष्ट्रवाद समाजविघातक असल्याचा आरोप आम आदमी पार्टी (आप)चे नेते व खासदार संजय सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना केला. 

खासदार संजय सिंग अचानकपणे सकाळी नागपुरात पोहोचले रविभवनात "आप'च्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. येथून ते मध्यप्रदेशकडे रवाना झाले. "आप'च्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार सिंग म्हणाले, भाजप व रा. स्व. संघाने गेल्या काही महिन्यांपासून देशात राष्ट्रवादाच्या नावावर हिंसाचार सुरू केला आहे. रा. स्व. संघ कधीही देशाच्या मुख्यप्रवाहात सामील नव्हता. देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनापासूनही रा. स्व. संघ दूर राहिला होता. स्वातंत्र्यानंतर तब्बल 52 वर्षे रा. स्व. संघाच्या नागपुरातील मुख्यालयात तिरंगा फडकला नव्हता. या संघटना व भाजप आता देशाला राष्ट्रवादाचे बोधामृत पाजत आहे, हाच एक मोठा विनोद असल्याचा टोला खासदार सिंग यांनी हाणला.
 
रा. स्व. संघाने कधीही सर्व समाजघटकांना समान मानले नाही. हिंदुत्वाच्या नावावर समाजातील अल्पसंख्यांक इतर समाज घटकांना दुय्यम वागणूक देण्याचे काम या संघटनेने केले आहे. देशात अनेक दंगली घडविण्यामागेही या संघटनेशी संबंधित विचारसरणीच्या लोकांचा संबंध असल्याचे आता अनेक घटनांमधून स्पष्ट झाल्याचा आरोप खासदार सिंग यांनी केला.
 

संबंधित लेख