nagar-vijay-auti-political-journey-student-leader-assembly-deputy-speaker | Sarkarnama

धाडसी आणि रोखठोक आमदार विजय औटी बनले विधानसभा उपाध्यक्ष

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय औटी यांचा विद्यार्थी दशेतील आंदोलक ते विधानसभेतील उपाध्यक्ष हा प्रवास पाहताना धाडसी व रोखठोक बोलणारा नेता म्हणून त्यांची ओळख पुढे येते. 

नगर : पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय औटी यांचा विद्यार्थी दशेतील आंदोलक ते विधानसभेतील उपाध्यक्ष हा प्रवास पाहताना धाडसी व रोखठोक बोलणारा नेता म्हणून त्यांची ओळख पुढे येते. 

विधानसभेचे उपाध्यक्ष झाल्यानंतर पारनेरमध्ये आनंद तर झाला, शिवाय आगामी विधानसभा निवडणूकही त्यांना सोपी झाल्याचे मानले जाते.

१९७५ साली विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर विद्यार्थी संघटनेने आंदोलने सुरू केली. त्या वेळी विजय औटी हा विद्यार्थी नेता सर्व विद्यार्थ्यांत पुढे दिसू लागला. याच वेळी या युवकात काहीतरी चुनूक आहे, हे राजकारण्यांनीही हेरले. त्यानंतर समाजिक स्तरावर आपण काम करावे, असा निश्चय करून सरकारी कर्मचारी संपाला पाठिंबा दिला व सत्याग्रह केला, या आंदोलनात त्यांना विसापूरच्या कारागृहात जावे लागले.

१९७८ ला दुष्काळी स्थितीमुळे विद्यार्थ्यांची फी माफ व्हावी म्हणून राज्यभर आंदोलने सुरू झाली. त्यात विजय औटी हा मुलगा आघाडीवर होता. त्यांनी त्यावेळी राज्यमंत्र्यांना घेरावो घालून केलेले आंदोलन पारनेर तालुक्यातील नेते अजूनही विसरले नाहीत. १९८५ ला विधानसभा निवडणूक लागल्यानंतर औटी यांनी उमेदवारी अर्ज भरला. लोकप्रिय युवक म्हणून ओळख निर्माण झाली असल्याने लोकांची सहानुभूती होती. या निवडणुकीत केवळ २२ मतांनी त्यांना पराभव स्विकारावा लागला. पराभवाची ही पहिलीच वेळ होती, असे म्हटले तर वावगे होणार नाही.

पराभवामुळे खचून न जाता त्यांनी समाजातील लोकांचे प्रश्न सोडविणे, आंदोलनात सहभाग नोंदविणे ही कामे चालूच ठेवली. २००२ मध्ये जिल्हा परिषदेत कॉंग्रेसकडून उमेदवारी केली. चांगल्या मतांनी निवडून आल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम सुरू केले. ही एक संधी मिळाली. पुढे दोन वर्षांत भरपूर कामे करता आली. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा प्रस्तापितांविरोधात दंड थोपटले. या वेळी शिवसेनेकडून उमेदवारी करीत ते निवडून आले. त्यानंतर २००९ मध्येही पुन्हा शिवसेनेकडूनच उमेदवारी करीत भरघोस मतांनी त्यांचा विजय झाला. हाच कित्ता पुन्हा गिरवत २०१४ मध्ये याच पक्षाकडून त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली. या तिनही टर्ममध्ये मात्र मंत्रीपदाने त्यांना कायम हुलकावणी दिली. याचे शल्य मनात कायम होते. मात्र त्यांच्या कर्तृत्वाला नशिबाची जोड मिळाली आणि काल विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

 

संबंधित लेख