nagar shetkari andolan | Sarkarnama

आमदाराच्या दारात जागरण अन खासदाराच्या दारात भोजन! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 जून 2017

शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी शेतकऱ्यांनी जिल्हाभर विविध ठिकाणी आंदोलने केली. त्यात भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या दारात जागरण गोंधळ घातला, तर खासदार दिलीप गांधी यांच्या दारात चटणी-भाकरी खावून निषेध नोंदवला.

नगर : शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी शेतकऱ्यांनी जिल्हाभर विविध ठिकाणी आंदोलने केली. त्यात भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या दारात जागरण गोंधळ घातला, तर खासदार दिलीप गांधी यांच्या दारात चटणी-भाकरी खावून निषेध नोंदवला. 

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर होत असलेल्या आंदोलनाचा समारोप पुणतांब्यात मुक आंदोलन करून करण्यात आला असला, तरी बुधवारी दिवसभर विविध प्रकारची आंदोलने सुरूच होती. 

राहुरीत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कांदा व दूध ओतून आंदोलन केले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून व नंतर अंत्ययात्रा काढून दहन करण्यात आले. शेवगावला आमदार मोनिका राजळे यांच्या घरासमोर जागरण गोंधळ घालून आंदोलन करण्यात आले. तीन तासांच्या वादावादीनंतर आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या कुकाणे येथील कार्यालयास शेतकऱ्यांनी कुलूप ठोकले. खासदार दिलीप गांधी यांच्या घरासमोर चटणी भाकरी खाऊन शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन केले. या पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. या वेळी शेतकरी व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकीही झाल्या. 

संबंधित लेख