डॉ. विखे, जगताप यांचे साकळाई योजना मार्गी लावण्याचे आश्वासन!

नगर व श्रीगोंदे तालुक्यातील सुमारे ३५ गावांना वरदान ठरू शकेल, अशा रखडलेल्या साकळाई पाणी योजनेचा मुद्दा अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांनी प्रतिष्ठेचा केला आहे. भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील व आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी प्रत्येक भाषणातून हा विषय छेडला. आपण खासदार झाल्यानंतर हा प्रश्न तातडीने मार्गी लावू, असे आश्वासन दिले.
डॉ. विखे, जगताप यांचे साकळाई योजना मार्गी लावण्याचे आश्वासन!

नगर : नगर व श्रीगोंदे तालुक्यातील सुमारे ३५ गावांना वरदान ठरू शकेल, अशा रखडलेल्या साकळाई पाणी योजनेचा मुद्दा अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांनी प्रतिष्ठेचा केला आहे. भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील व आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी प्रत्येक भाषणातून हा विषय छेडला. आपण खासदार झाल्यानंतर हा प्रश्न तातडीने मार्गी लावू, असे आश्वासन दिले. त्यामुळे दोन्हीपैकी एक खासदार होणारच आहे, तर ही योजना नक्की पूर्णत्त्वास येईल का, असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.

योजनेसाठी लढले अनेकजण
साकळाई पाणी योजना पूर्ण व्हावी, यासाठी कृती समिती आणि संबंधित गावांतील लोकांचा लढा सुरू आहे. या योजनेसाठी यापूर्वी समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी, बाबा झेंडे महाराज, सोमनाथ घाडगे आदींनीही प्रयत्न केले. श्रीगोंदे तालुक्यातील सर्वच पक्षाचे नेत्यांनी या योजनेला पुढे करून विधानसभा गाजविल्या. अनेकांनी जिंकल्या, पण पुढे त्याचे काहीच झाले नाही. आमदार राहुल जगताप, माजी आमदार बबनराव पाचपुते यांनी अनेकदा याप्रश्नी शासनस्तरावर प्रयत्न केले. डाॅ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप यांनीही सध्याच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रयत्न केले. मागील दोन महिन्यांपूर्वी मराठी सिने अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे अचानक या योजनेवरील प्रेम दिसून आले. त्यांनी पाठपुरावा सुरू केला. त्या वेळी कामाचा सर्वे आठ दिवसांत सुरू होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. त्यामुळे त्या लोकसभेच्या रिंगणात पुन्हा उतरणार, हे स्पष्ट झाले होते. मात्र त्यांनी उमेदवारी न करता भाजपचे उमेदवार डाॅ. विखे यांना साकळाईच्या मुद्द्यावर पाठिंबा दिला. 

प्रत्येक सभांमध्ये आश्वासनांची खैरात
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील पारनेर, नगर तालुका व श्रीगोंदे तालुक्यांतील सभांमध्ये साकळाई योजनेवर प्रत्येक नेता भाषण करतो, परंतु ही योजना इतक्या दिवस का रखडली, कोणामुळे रखडली व ती सोडविण्यासाठी उपाययोजना काय करणार, याबाबत सर्वच नेते विशेष काही बोलत नाही. केवळ विरोधकांमुळे योजना रखडली, एव्हढाच सूर त्यामागे असतो, हे विशेष.

काय आहे योजना ?
कुकडी प्रकल्पाचे पावसाळ्यात वाया जाणारे पाणी विसापूर धरणात बंद पाइपने उचलून तेथून ११ किलोमीटर लांब असलेल्या साकळाई डोंगरावर नेण्यात येईल. तेथून पुन्हा बंद पाइपने नैसर्गिक उताराने हे पाणी नगर तालुक्याच्या बाजुने सुमारे ११ किलोमीटरच्या अंतरातील १७ गावांना दिले जाईल. तसेच अशाच पद्धतीने श्रीगोंद्यातील १८ गावांना नैसर्गिक उताराने दिले जाईल. नगर तालुक्यातील हिवरे झरे, घोसपुरी, सारोळा कासार, खडकी, बाबुर्डी बेंद, वाळकी, दहीगाव तसेच इतर गावांसह १७ गावांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. श्रीगोंदे तालुक्यातीलही १८ गावांचा समावेस आहे. दोन्ही तालुके मिळून ३५ दुष्काळी गावांसाठी साकळाई योजना वरदान ठरणार आहे. ही योजना पूर्ण झाली तर संबंधित गावांचा चेहरा बदलणार आहे. माळरानावरही हिरवाई फुलणार आहे. सुमारे १२० पाझर तलाव, शंभर कोल्हापुर पद्धतीचे बंधारे भरून सुमारे १८ हजार ५०० हेक्टर क्षेत्र बागायती होईल. सुमारे ८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाची ही योजना स्पव्नगत वाटत असताना प्रत्येक निवडणुका आल्या की लोकांच्या आशा पल्लवीत होत आहेत. १९९८ पासून साकळाई योजनेचा प्रश्न चर्चेत आला. तेव्हा युती शासनाच्या काळात या योजनेला तत्त्वतः मंजूरी मिळाली होती. त्यानंतर मात्र निवडणुका आल्या, की या योजनेचे भांडवल होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com