nagar pratap dhakane may be ncp candidate | Sarkarnama

लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून प्रताप ढाकणे?; 25 मार्चला पाथर्डीत शक्‍तीप्रदर्शन! 

मुरलीधर कराळे 
शुक्रवार, 9 मार्च 2018

नगर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी कोणाची राहणार, याबाबत राजकीय खलबते सुरू असतानाच राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांचे आता नाव पुढे येऊ लागले आहे. येत्या 25 मार्च रोजी प्रताप ढाकणे यांचे वडील ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांच्या बायोफोटोग्राफीचे प्रकाशन होत आहे.

नगर : नगर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी कोणाची राहणार, याबाबत राजकीय खलबते सुरू असतानाच राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांचे आता नाव पुढे येऊ लागले आहे. येत्या 25 मार्च रोजी प्रताप ढाकणे यांचे वडील ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांच्या बायोफोटोग्राफीचे प्रकाशन होत आहे.

या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार पाथर्डीत येणार आहेत. या वेळी प्रताप ढाकणे जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी सुरू आहे. कॉग्रेस व राष्ट्रवादीच्या युतीत ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने ढाकणे हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतील, त्यामुळे या चर्चेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्‍यता आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादी जागा सोडणार नसल्याचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते अजित पवार यांनी नगरला एका कार्यक्रमात ठामपणे सांगितले होते. ढाकणे यांनी मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारीच्या कारणावरूनच भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांनी जनसंपर्क चांगला वाढविला. शिवाय भाजप नेत्यांशीही त्यांचे कायम चांगले संबंध राहिले. पाथर्डी व शेवगाव तालुक्‍याबरोबरच मतदारसंघातील इतर तालुक्‍यांतही त्यांनी संपर्क वाढविला आहे. या पार्श्वभूमीवर ते शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे समजते. 

प्रशांत गडाख यांच्याही नावाची चर्चा 
शरद पवार व यशवंतराव गडाख यांच्यातील मित्रत्त्वामुळे लोकसभेचे उमेदवार प्रशांत गडाख असतील, अशी चर्चा सुरू आहे. गडाख यांचा अभिष्ठचिंतनाचा कार्यक्रम आगळा-वेगळा करून प्रशांत गडाख यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यामुळे या चर्चेला अधिक उधाण आले होते. तथापि, आता प्रताप ढाकणे यांनीच मोर्चेबांधणी सुरू केल्याने आगामी काळात राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून ढाकणे यांचेच नाव पुढे येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्यामुळे साहजिकच प्रशांत गडाख यांचे नाव मागे पडू लागले आहे. 

संबंधित लेख