Nagar Politics Chhindam issue : BJP not to contest dy mayor election | Sarkarnama

 छिंदम वक्तव्याचे प्रायश्चित्त : भाजपची उपमहापाैरपदाच्या शर्यतीतून  माघार !

मुरलीधर कराळे : सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 मार्च 2018

उपमहापाैरपदासाठी उमेदवार उभा न करण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांनी आज घेतला आहे.

नगर  :  श्रीपाद छिंदम याने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द वापरल्याने त्याला उपमहापाैरपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे शिवसेना - भाजप युतीमध्ये भाजपच्या वाट्याला असलेल्या उपमहापाैरपदी भाजपच्या कोणाला संधी मिळेल, ही चर्चा सुरू असतानाच या घटनेचे प्रायश्चित्त म्हणून भाजपने या शर्यतीतून माघार घेतली आहे. उपमहापाैरपदासाठी उमेदवार उभा न करण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांनी आज घेतला आहे.

श्रीपाद छिंदम याच्या वक्तव्याने नगर शहर भाजपचे नेते अडचणीत आले आहेत. विशेषतः खासदार दिलीप गांधी यांची मोठी कोंडी झाली आहे. भाजपमधील अॅड. आगरकर व खासदार गांधी या दोन गटांत मागील काही वर्षांपासून सुंदोपसुंदी सुरू आहे.छिंदम हा गांधी गटातील असल्याने खासदार गांधी व त्यांचे पुत्र नगरसेवक सुवेंद्र गांधी यांची अडचण वाढली. 

छिंदम याने उपमहापाैरपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले. या वर्षाच्या अखेरीस महापालिकेची निवडणूक लागणार आहे. त्यामुळे आठ महिन्यांसाठी या पदाची माळ गळ्यात घेण्यासाठी भाजपच्या आगरकर गटाच्या काही नगरसेवकांनी व्यूह रचना केली. मात्र छिंदम प्रकरणामुळे नाचक्की झाल्याने आता या पदासाठी उमेदवार न देण्याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार दिलीप गांधी आणि शहर जिल्हा पदाधिकाऱ्यांमध्ये मुंबईत झालेल्या बैठकित हा निर्णय घेण्यात आला.

संबंधित लेख