Nagar politics Babanrao Pachpute | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

मेलेली कोंबडी जाळाला घाबरत नाही : पाचपुते

मुरलीधर कराळे
गुरुवार, 20 जुलै 2017

घोड धरणाचे आम्ही सोडलेले पाणी पुन्हा बंद करण्यासाठी काही व्यक्तींकडून अधिकाऱ्यांना दादागिरी केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांवर कुणी दादागिरी करू नये. कागदी घोडे नाचवून लालफितीच्या कामात अधिकाऱ्यांनीही अडकू नये - बबनराव पाचपुते

नगर : ''अधिकारी नियमावर बोट ठेवून दुसऱ्याच्या इशाऱ्यावर नाचत शेतकऱ्यांना झुलवत ठेवत आहेत. पाणी न सोडण्यामागे तेच कारण आहे. मेलेली कोंबडी जाळाला घाबरत नाही. आम्ही सर्व शेतकरी आता मेलेलोच आहोत. त्यात माझ्याकडे कोणतेही राजकीय पद नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. आता मी घोडचे पाणी सोडल्याशिवाय हटत नाही.'' असा ठाम निर्णय माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केला. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली सध्या श्रीगोंदे तालुक्‍यात पाणी सोडण्यासाठी आंदोलन सुरू आहे. याबाबत दूरध्वनीद्वारे प्रतिक्रिया देताना त्यांनी अधिकारी व विरोधकांचा समाचार घेतला.

नियमावर बोट ठेवा पण...
बुधवारी पाणीप्रश्‍नावर पाचपुते यांनी आक्रमक व थेट भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्यासमवेत घोड धरण गाठले होते. तेथे उपअभियंता जे. बी. भरट व मढेवडगाव येथील उपअभियंता प्रकाश लंकेश्वर यांना त्यांनी धारेवर धरले होते. अधिकाऱ्यांना घेरावो घालून निषेध केला. धरणात 21 टक्केच उपयुक्त पाणीसाठा असून, नियमानुसार 33 टक्के साठा झाल्याशिवाय आवर्तन सोडता येणार नाही, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली होती. त्या वेळी पाचपुते यांनी नियमावर बोट ठेवा; पण शेतकऱ्यांची अवस्था व पाणलोटातील पाऊस या दोन्ही बाबी जमेला ठेवा, असे सुचविले होते. मात्र, पालकमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश आल्याशिवाय पाणी सोडता येणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याने पाचपुते यांनी स्वतः पुढाकार घेत "घोड'च्या डाव्या कालव्याचे गेट उघडले होते. ते गेल्यानंतर अधिकाऱ्यांनी पुन्हा बंद केले. आज पुन्हा पाचपुते यांनी धरण काठले. आणि आंदोलन सुरू केले आहे.

कुणी दादागिरी करू नये
घोड धरणाचे आम्ही सोडलेले पाणी पुन्हा बंद करण्यासाठी काही व्यक्तींकडून अधिकाऱ्यांना दादागिरी केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांवर कुणी दादागिरी करू नये. कागदी घोडे नाचवून लालफितीच्या कामात अधिकाऱ्यांनीही अडकू नये, अन्यथा शेतकरी संबंधितांसह अधिकाऱ्यांनाही सोडणार नाहीत, असा इशारा पाचपुते यांनी दिला.

संबंधित लेख