नगरमध्ये बाकांच्या खरेदीत साडेतेरा लाखांचा भ्रष्टाचार 

नगरच्या महापालिकेत भिस्तबाग रस्त्यातील गैरव्यवहार दडपण्यासाठी स्थायी समितीच्या निधीतून बाके खरेदीच्या नावाखाली साडेतेरा लाख रुपयांची रक्कम पदाधिकाऱ्यांनीच खिशात घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नगरमध्ये बाकांच्या खरेदीत साडेतेरा लाखांचा भ्रष्टाचार 

नगर : नगरच्या महापालिकेत भिस्तबाग रस्त्यातील गैरव्यवहार दडपण्यासाठी स्थायी समितीच्या निधीतून बाके खरेदीच्या नावाखाली साडेतेरा लाख रुपयांची रक्कम पदाधिकाऱ्यांनीच खिशात घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पाहणी अहवालाविनाच ठेकेदाराच्या नावाने धनादेश काढण्यास नकार देणाऱ्या उपायुक्तांना थेट दमबाजी करण्यात आल्याचे उघड होत आहे. याबाबत सत्ताधारी काही नगरसेवकांनी हा गौप्यस्फोट केला. 

बाके खरेदीचा घोळ 
नागरिकांना बसण्यासाठी 96 बाके खरेदी करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या बांधकाम विभागाने ठेवला होता. त्यासाठी स्थायी समितीकडून 16 लाख 27 हजार 500 रुपयांचा निधी ऑगस्ट 2016 मध्ये मंजूर झाला. मात्र नंतर या प्रस्तावाकडे दुर्लक्ष झाले. मागील महिन्यात स्थायी समितीने बांधकाम विभागास बाके खरेदी करण्याची फाइल तयार करण्यास सांगितले. त्यानुसार शाखा अभियंता, शहर अभियंता, उपायुक्त, लेखाधिकारी आदींच्या सह्यांनी बील काढण्यास सांगितले. मात्र पाहणी अहवाल जोडावा लागेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आता एवढे बाकेच नाहीत, तर अहवाल कुठून देणार, हा प्रश्न होता. त्यावर संबंधित पदाधिकाऱ्यांनी थेट उपायुक्तांना धमकी देऊन भिस्तबाग रस्त्यातील गैरव्यवहार उजेडात आणू असे फर्मावले. मागचे प्रकरण दडपण्यासाठी अवघी आठ बाके खरेदी करून उर्वरित बाके खरेदी झाल्याचे दाखवून उर्वरित रक्कम खिशात घालण्यात आली, असा आरोप सत्तेतील काही नगरसेवकांनी केला आहे. 

उपायुक्तांना धमकी देऊन घेतली सही 
भिस्तबाग प्रकरणात शाखा अभियंत्यापासून आयुक्तांपर्यंत सर्वांचीच माळ लावली जाईल, अशी थेट धमकी देऊन बाक खरेदीच्या प्रस्तावावर सही करण्यास भाग पाडले असल्याची जोरदार चर्चा सत्ताधारी नगरसेवकांत आहे. याबाबत उपायुक्त मात्र काहीही बोलत नाहीत. 

भिस्तबाग रस्त्यात गैरव्यवहार 
एकाच रस्त्याच्या तीन वेळा निविदा काढून एकाच कामाचे तीन वेळा पैसे लाटल्याचा प्रकार म्हणजेच भिस्तबाग रस्त्यातील गैरव्यवहाराचे प्रकरण होय. महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर भिस्तबाग येथील रस्त्याच्या कामातील गैरव्यवहाराचा आरोप स्थायी समितीचे सभापती सचिन जाधव यांनी गेल्या महिन्यात केला होता. या प्रकरणात अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येईल, असेही जाधव यांनी स्पष्ट केले होते. मात्र गुन्हा दाखल करण्याऐवजी गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या विभागाकडेच चौकशीची जबाबदारी सोपविण्यात आली. याबाबतचा अहवाल शहर अभियंता पी. एम. रजपूत यांनी तयार केला. तथापि, महिनाभरानंतरही तो सादर झाला नाही. रस्त्याचे काम पूर्ण न होताच बिल देण्यात आल्याचे उघड झाले. रस्त्याचे भूसंपादन झालेले नसतानाही निविदा कशा काय काढल्या, हा प्रश्नही पुढे उघडकीस आला. या सर्व प्रकरणात बांधकाम विभाग मात्र तोफेच्या तोंडी होता. त्यामुळे गुन्हे दाखल करू असे म्हणणारे सभापती जाधव यांनी नंतर मौन का बाळगले, हा प्रश्न आहे. या सर्व प्रकरणामुळे बांधकाम विभागाचा गैरव्यवहार झाकण्यासाठी बाकाचा गैरव्यवहार पुढे आल्याची चर्चा आहे. 

त्या नगरसेवकांमध्ये चर्चा असेल : अभियंता 
दरम्यान, महापालिकेचे शाखा अभियंता श्रीकांत निंबाळकर यांनी खुलासा करताना म्हटले, की स्थायी समितीच्या निधीतून मागील वर्षी 96 बाके खरेदी करण्याचा प्रस्ताव होता. मात्र या वर्षी 88 बाके खरेदी करण्यात आली. पाच नगरसेवकांना त्यांच्या मागणीनुसार बाके दिली. ज्यांना बाके मिळाली नाहीत, त्यांनी ही चर्चा घडवून आणली असेल. 

ही चर्चा चुकीची : सचिन जाधव 
मागणी करूनही ज्यांना बाके मिळाली नाही, तेच सत्ताधारी पक्षातील दोन-चार नगरसेवक चुकीची चर्चा करीत आहेत. प्रत्यक्षात प्रस्तावापेक्षा 12 बाके कमी मिळाली. मिळालेली बाके भगवान फुलसौदर, मनोज दुलम, श्रीनिवास बोज्जा, अनिल बोरुडे व सचिन जाधव यांच्या प्रभागात देण्यात आली. बाके न मिळाल्याने ही चर्चा इतर नगरसेवकांनी उठविल्याचे, स्थायी समितीचे सभापती सचिन जाधव यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com