nagar politics | Sarkarnama

"कालवा मुक्कामा'ला अखेर यश 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 मे 2017

कुकडी कालव्यांना पाणी सोडून श्रीगोंदे तालुक्‍यातील शेतीला पाणी मिळण्यासाठी मागील आठ दिवसांपासून विविध आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न करणारे श्रीगोंदे विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल जगताप यांच्या आंदोलनाला अखेर यश आले. गॅस कटरच्या साह्याने कालवा फोडला, चार दिवस कालवा मुक्काम आंदोलन आणि शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या उपोषणामुळे जादा पाणी सोडण्याचा निर्णय झाला. 

नगर : कुकडी कालव्यांना पाणी सोडून श्रीगोंदे तालुक्‍यातील शेतीला पाणी मिळण्यासाठी मागील आठ दिवसांपासून विविध आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न करणारे श्रीगोंदे विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल जगताप यांच्या आंदोलनाला अखेर यश आले. गॅस कटरच्या साह्याने कालवा फोडला, चार दिवस कालवा मुक्काम आंदोलन आणि शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या उपोषणामुळे जादा पाणी सोडण्याचा निर्णय झाला. 

जगताप यांना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नी विधानसभेत निलंबित केल्यानंतर त्यांचे जिल्ह्यात जोरदार स्वागत झाले. हे वातावरण निवळते तोपर्यंत कुकडी कालव्यातून पाण्याचा प्रश्‍न पुढे आला. त्यात त्यांनी इतर नेत्यांच्या तुलनेत जोरदार मुसंडी मारली. तालुक्‍यातील इतर पक्षाच्या नेत्यांनी मागणी करून निवेदने दिली. जगताप यांनी थेट गॅस कटरच्या साह्याने कालवा फोडण्याचे आंदोलन केले. त्यातूनही यश येत नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी चार दिवस कुकडी कालवा मुक्का आंदोलन केले. हजारो शेतकरी सोबतीला होते. या आंदोलनात पोलिसांनी जगताप यांच्यासह अण्णा शेलार, बाळासाहेब नाहाटा व अनेक शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. आता जादा पाणी सोडण्याचे आश्‍वासन मिळाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात पाणी आले नाही, तर पुन्हा शेतकऱ्यांसह आत्मदहन करण्याचा इशारा दिला. 

फळबागांनाही पाणी 
पाणी सोडण्याच्या या निर्णयामुळे "कुकडी'खालच्या 27 पाझर तलावांत पाणी सोडले जाणार आहे. याबरोबरच उर्वरित पाणी फळबागांना देण्याचा निर्णय झाला आहे. कालवा सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर तालुक्‍यातील केवळ अकरा पाझर तलावांत पाणी सोडण्याचे ठरले होते; पण आपल्या आंदोलनानंतर 27 तलावांत पाणी जाणार आहे. तसेच, तालुक्‍यातील सगळ्या ठिकाणच्या फळबागांनाही पाणी देण्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा अपव्यय टाळतानाच, जलसंपदा विभागाला सहकार्य करण्याचे आवाहनही जगताप यांनी केले. आंदोलनात प्रा. तुकाराम दरेकर, शेलार, नाहाटा, विश्वास थोरात, हरिदास शिर्के, ऋषिकेश गायकवाड सहभागी झाले होते. 

प्रसंगी आत्मदहन करणार : जगताप 
जलसंपदा विभागाने पाणी सोडण्याचे आश्‍वासन दिले असले, तरी प्रत्यक्षात पाणी सोडले नाही, तर हजारो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहेत. मागील आठ दिवसांपासून विविध आंदोलने करूनही जर सत्ताधाऱ्यांना जाग येत नसेल, तर अशा आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे आमदार राहुल जगताप यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

संबंधित लेख